पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या रिंगरोड प्रकल्पाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. या रिंगरोडसाठीची अधिसूचना शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार खेड, हवेली, मुळशी आणि मावळ या चार तालुक्यातील 44 गावांमधून हा रिंगरोड जाणार आहे. या अधिसूचनेमध्ये कोणत्या गावातून, कोणत्या सर्व्हें नंबरमधून रिंगरोड जात आहे. तसेच त्या सर्व्हेनंबरमधील किती क्षेत्र संपादित करावे लागणार आहे, याबाबतची माहिती अधिसूचनेमध्ये प्रसिद्ध केली आहे. यामुळे पीएमआरडीएच्या अंतर्गत रिंगरोडला गती मिळणार आहे.
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पीएमआरडीए प्रादेशिक विकास आराखड्यातील रिंगरोड विकसित करण्याचा निर्णय घेतला. मागील काही वर्षांपासून कागदावरच असलेला रिंगरोड करण्याच्या दृष्टीने आता शासनाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच पहिला टप्पा म्हणजे याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्प वेळेत उभारण्यासाठी शासनाने अधिसूचनेद्वारे सामाजिक परिणामाच्या सर्वेक्षणातून सूट दिली आहे.
याबाबतची अधिसूचना महसूल व वन विभागाचे उपसचिव सुनील कोठेकर यांनी जारी केली आहे. रिंगरोड प्रकल्प उभारल्यास त्याचा सामाजिक परिणाम काय होऊ शकतो याचा अभ्यास संस्थांकडून करण्यात येतो. त्यानंतर या प्रकल्पास मंजुरी मिळते. एखादा मोठा प्रकल्प उभारायचा असेल तर असे सर्वेक्षण करणे आवश्यक असते. मात्र, राज्य शासनाने रिंगरोडसाठी सामाजिक परिणाम निर्धारणाबाबतच्या तरतुदी लागू करण्यापासून कलम 10 क अन्वये सूट दिली आहे. या अधिसूचनेमध्ये 44 गावांमधील सुमारे 1 हजार 301 सर्व्हे नंबरमधून हा रिंगरोड जाणार असून यासाठी सुमारे 720 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.
या गावांमधून जाणार रिंगरोड
तालुका – गावांची नावे अनुक्रमे खेड – सोलू, हवेली – निरगुडी, वडगाव शिंदे, लोहगाव, वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोळवडी, कदमवाकवस्ती, फुरसुंगी, वडकी, उरुळी देवाची, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द, नऱ्हे, धायरी, वडगाव खुर्द, नांदेड, शिवणे, वारजे, मुळशी -बावधन खुर्द, भूगाव, बावधन बु, सूस, नांदे, माण, हिंजवडी, मारुंजी, नेरे, जांबे, मावळ – सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोदुंब्रे, धामणे, परंदवाडी.