– प्रा. विजय कोष्टी
‘एप्रिल फूल’ची सुरुवात केव्हा, कोठे आणि कशी झाली? विविध देशांमध्ये हा दिवस कसा साजरा केला जातो, त्यामागे कोणत्या अख्यायिका आहेत आणि भारताच्या दृष्टीने याचे महत्त्व काय आहे आदी बाबी जाणून घेऊया.
1 एप्रिल हा दिवस जागतिक मूर्ख दिवस अर्थात ‘एप्रिल फूल’ म्हणून अनेक देशात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण दुसर्याला मूर्ख बनवत असतो, तर मूर्ख बनलेल्यालाही इतर दिवसांप्रमाणे या दिवशी मूर्ख बनविणार्याचा राग येत नाही, हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. तथापि, कोणीही यादिवशी ‘एप्रिल फूल’च्या नावाखाली खोट्या अफवा, संदेश पसरवू नयेत. किंबहुना, सद्यस्थितीत समाजमाध्यमांचा अत्यावश्यक कामांसाठीच वापर करावा असे वाटते.
1 एप्रिल हा दिवस मित्रांना मूर्ख बनविण्याचा, वेड्यात काढण्याचा, फसविण्याचा म्हणजेच एप्रिल फूल करण्याचा दिवस समजला जातो. या दिवशी अनेक जण आपल्या मित्र-मैत्रिणींना काहीतरी खोटे सांगून फसविण्याचा प्रयत्न करीत असतात. याचे नियोजन खूप आधीपासून चाललेले असते. विशेष म्हणजे फसगत झालेला इतर दिवसाप्रमाणे या दिवशी न रागावता हसण्यावारी नेऊन त्यांच्या आनंदात तोही सहभागी होतो. एकंदर या दिवशी ‘बुरा न मानो, होली है’ असेच सगळीकडे वातावरण पहावयास मिळते.
वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी हा दिवस साजरा केला जातो. न्यूझीलंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये दुपारपर्यंतच एप्रिल फूल करण्याची पारंपरिक पद्धत आहे. दुपारनंतर असे करणार्यासच ‘एप्रिल फूल’ समजले जाते. ब्रिटनमधील वृत्तपत्रामध्ये ‘एप्रिल फूल’निमित्त एक मुख्य पान काढले जाते. तथापि, ते केवळ मॉर्निंगच्या आवृत्तीसाठीच असते. याशिवाय फ्रान्स, आयर्लंड, इटली, दक्षिण कोरिया, जपान, रशिया, नेदरलँड, जर्मनी, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेमध्ये ‘एप्रिल फूल’चा माहौल पूर्ण दिवसभर असतो.
‘एप्रिल फूल’ची सुरुवात
‘एप्रिल फूल’ दिवसाची सुरुवात कशी झाली याविषयी निश्चित अशी एक कथा किंवा आख्यायिका नसली, तरी सर्वाधिक मान्यता ब्रिटीश लेखक चॉसर यांच्या ‘द कँटरबरी टेल्स’ या पुस्तकातील ‘नन्स प्रीस्टस टेल’ या कथेवर आधारलेली आहे. 13व्या शतकामध्ये इंग्लंडचा राजा रिचर्ड द्वितीय आणि बोहेमियाची राणी अॅनी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीख ‘32 मार्च’ जाहीर केली जाते आणि कँटरबरीतील लोक ती खरी मानतात. मात्र ‘32 मार्च’ ही तारीख अस्तित्वात नसल्याने मूर्ख बनविले जाते. तेव्हापासून ‘1 एप्रिल’ हा दिवस ‘मूर्ख दिवस’ समजला जातो.
दुसर्या एका कथेनुसार, प्राचीन युरोपमध्ये नवीन वर्ष ‘1 एप्रिल’ला साजरे करण्याचा प्रघात होता. तथापि, 1564 मध्ये राजा चार्ल्स (नववा)ने नवीन कॅलेंडर अस्तित्वात आणले आणि नवीन वर्ष 1 जानेवारीला साजरे करण्याचे निर्देश दिले. मात्र बहुतांश लोकांनी 1 एप्रिललाच नवीन वर्ष मानले, तेव्हा अशा लोकांना मूर्ख समजून त्यांची मस्करी करण्यात आली.
आणखी एका कथेनुसार 1915 मध्ये जर्मनीच्या लिले विमानतळावर एका ब्रिटिश पायलटने खूप मोठा बॉम्ब फेकला. हे पाहून तेथे उपस्थित सर्व लोक इकडून-तिकडे पळू लागले आणि बराच वेळ लपून बसले. मात्र, बराच वेळ झाला तरी कोणताही धमाका न झाल्याने लोकांनी परत येऊन त्या जागी पाहिले तर तो बॉम्ब नसून एक मोठा फुटबॉल असल्याचे आणि त्यावर ‘एप्रिल फूल’ लिहिल्याचे स्पष्ट झाले.
‘एप्रिल फूल’च्या संदर्भात 1 एप्रिल 1860 हा दिवस तर इतिहासात विशेष प्रसिद्ध आहे.
या दिवशी हजारो लोकांना टपालाद्वारे लंडन येथील ‘टॉवर ऑफ लंडन’ येथे सायंकाळी पांढर्या गाढवांच्या स्नानाचा कार्यक्रम होणार असून सर्वांनी त्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले. विशेष म्हणजे त्याकाळी सामान्य जनतेला ‘टॉवर ऑफ लंडन’मध्ये प्रवेश वर्ज्य होता. संध्याकाळ होताच टॉवरजवळ हजारोंच्या संख्येने लोक जमू लागले आणि आत प्रवेश करण्यासाठी धक्का-बुक्की करू लागले. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याला मूर्ख बनविले गेले आहे, तेव्हा ते वैतागून घरी गेले.
भारतीय कॅलेंडरची कथा
पूर्वी भारतीय कॅलेंडरही अधिकृत मानले जायचे ज्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून म्हणजेच एप्रिल पासून होते. तथापि, 1582 मध्ये पोप ग्रेगरी यांनी नवीन कॅलेंडर लागू केले ज्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात एप्रिलऐवजी जानेवारीपासून होऊ लागली. बर्याचशा लोकांनी हे नवीन कॅलेंडर मान्य केले. तथापि, काही लोकांनी नवीन कॅलेंडर मानले नाही आणि ते एप्रिलमध्येच नवीन वर्ष साजरे करू लागले. या लोकांना मूर्ख समजले जाऊन येथूनच 1 एप्रिल हा दिवस मूर्खांचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.
तेव्हा, ‘एप्रिल फूल’ ही पाश्चिमात्य देशांची संकल्पना असली तरी आज भारतासहित जगातील अनेक देशांमध्ये हा दिवस मोठ्या धडाक्यात साजरा केला जातो. यानिमित्ताने, ही गंमत करताना अनेकांना मोठे नुकसानसुद्धा होऊ शकते, हे लक्षात घेऊन ‘एप्रिल फूल’ साजरा करताना अशा काही गोष्टी कुणीही करू नयेत की ज्यामुळे समोरच्याचे नुकसान होईल किंवा त्या व्यक्तीला इजा होईल.