जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेतील एका रहिवासी इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये किमान 64 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जोहान्सबर्गमधील या पाच मजली इमारतीमध्ये बहुसंख्य शरणार्थ्यांचा आश्रय होता, असे आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
ही आग नेमक्या कोणत्या कारणामुळे भडकली हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही. डझनभर बचाव कर्मचारी आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी मदत कार्यासाठी दुपारपर्यंत प्रयत्न केले होते. अनेक जणांचे मृतदेह इमारतीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते. तर जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. जखमींपैकी अनेक जणांना श्वास गुदमरल्याचा त्रास झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आगीमुळे इमारत जळून खाक झाली आहे. त्यामुळे या इमारतीतील रहिवाशांच्या निवासासाठी पर्यायी व्यवस्था केली जात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
या आगीमध्ये एकूण 64 जणांचा मृत्यू झाला, तर 43 जण जखमी झाले आहेत. या इमारतीमध्ये अनौपचारिकपणे अनेकांनी आश्रय घेतला असावा. हे सर्वजण इमारतीत अडकून पडले असावेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.