मुंबई – दक्षिणेकडील चित्रपटसृष्टीतील अभिनेते गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने हिट चित्रपट देत आहेत. त्यामध्ये पुष्पा – द राईज, आरआरआर, केजीएफ – चाप्टर टू आणि विक्रम या चित्रपटांचा समावेश होतो. त्याचवेळी बॉलिवुडमधील चित्रपट पाठोपाठ फ्लॉप ठरले असल्याने जाहिरातींच्या क्षेत्रातही दक्षिणेकडील कलाकारांनी मोठी झेप घेतल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये बॉलिवुडमधील मोठ्या अपेक्षा असलेला अमीर खानचा लालसिंग चढ्ढा, अक्षयकुमारचा बेलबॉटम, रक्षाबंधन आणि बच्चन पांडे, रणबीर कपूरचा शमशेरा आणि रणवीरसिंगचा जयेशभाई जोरदार हे चित्रपट चालले नाहीत.
दक्षिणेकडील तेलुगु आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते अल्लू अर्जुन, महेश बाबू, रश्मिका मंदाना, समंथा प्रभू, प्रभास आणि विजय देवरकोंडा यांनी कोका-कोला, फ्रुटी, किंगफिशर, रेडबस, मॅकडोनाल्डस्, बोटस् यासारख्या देशपातऴीवरील ब्रँडसच्या जाहिरातील पटकावून बॉलिवुडमधील टॉप अभिनेत्यांना मागे टाकले आहे. अनेक ब्रँडसनी दक्षिणेतील अभिनेत्यांनी चढ्या दराने मानधन देऊन जाहिरातीसाठी करारबद्ध केले असल्याचे वृत्त अर्थविषयक इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. त्यासाठी त्यांनी टॅम मिडिया रिसर्चच्या अहवालाचा दाखला दिलेला आहे.
टॅम अॅडेक्स सेलिब्रिटी ट्रॅक्सच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांमध्ये प्रादेशिक अभिनेते हे नॅशनल ब्रँड अॅम्बेसिडर होऊ लागले आहेत. विविध ब्रँड जाहिरातींसाठी विचार करताना प्रादेशिकतेचा नव्हे तर ग्राहकांच्या पसंतीला प्राधान्य देतात. शीतपेयांची कंपनी कोका-कोलाने पुष्पा – द राईजमुळे देशभरात पोचलेल्या अल्लु अर्जुनला जाहिरातीत घेतले आहे. त्याचबरोबर रेडबस, केएफसी आणि अॅस्ट्रल हे ब्रँड त्याच्या खिशात आहेत. रश्मिका मंदानाकडे किंगफिशर, बोटस्, कॅशिफाय तर समंथा प्रभूकडे मिंत्रा आणि मंच हे नॅशनल ब्रँड आहेत. रामचरण फ्रुटीची जाहिरात करत आहे. अल्लु अर्जुनला अगदी हिंदी भाषक बाजारपेठेसह भारतभर लोकप्रियता लाभली असल्याने त्याला कोका-कोलाच्या जाहिरातीत स्थान मिळाल्याचे कोका कोला कंपनीचे भारत आणि आग्नेय आशियाचे उपाध्यक्ष आणि मार्केटिंग हेड अर्नब रॉय यांनी म्हटले आहे.
कोका-कोलाने मागील महिन्यात अल्लु अर्जुनचा समावेश असलेले ब्रँडसाठीचे गाणे रिलीज केले आहे. त्याला तीन कोटी व्ह्युज मिळाले आहेत.
दुसरीकडे आरआरआर चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर तेलुगु अभिनेता रामचरण पार्ले अॅग्रोच्या फ्रुटी या मँगो ड्रिंकमध्ये अलिया भटसमवेत झळकतो आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्या अभिनेत्यांना जाहिरातींसाठी बॉलिवुड अभिनेत्यांच्या तुलनेत घसघशीत मानधन मिळत आहे. अल्लु अर्जुन ब्रँडमागे साडेसात कोटी रुपये घेतो. त्याच्याकडे केएफसी, झोमॅटो आणि बांधकाम साहित्याचे उत्पादन करणारा अॅस्ट्रल हा ब्रँडदेखील आहे. त्याउलट रणवीरसिंगसारख्या बॉलिवुडमधील अभिनेत्याला ब्रँडमागे 3.5 ते 4 कोटी रुपये मिळतात.
दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबू रॉयल स्टॅग, टीव्हीएस मोटर्स आणि माऊंटन ड्यूच्या जाहिरातींमध्ये दिसत आहे. तो ब्रँडमागे 1 कोटी रुपये मानधन घेतो. समंथा प्रभू पेप्सीकोचा कुरकुरे आणि ऑनलाईन फॅशन कंपनी मिंत्राच्या जाहिरातीत आहे.