नवी दिल्ली -अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये कंपूशाही विरोधात सुरू झालेले वाक्युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. उलट या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता गंभीर स्वरूप घेऊ लागल्या आहेत. प्रख्यात गायक सोनू निगम याने टी सीरीजचा मालक भूषण कुमार याला लक्ष्य केल्यानंतर आता कुमारची पत्नी दिव्या खोसला मैदानात उतरली आहे. तिने एक क्लीप जारी करून सोनूच्या आरोपांना उत्तर तर दिलेच मात्र, सोनूचे गॅंगस्टर अबु सालेमशी असलेल्या कथित संबंधांची चौकशी करण्याची मागणीही केली आहे.
सुशांतच्या आत्महत्येनंतर सोनूने एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्याने बॉलीवूडच्या म्युझिक इंडस्ट्रीतील कथित एकाधिकारशाहीवर प्रकाश टाकला होता. या इंडस्ट्रीत केवळ दोनच कंपन्यांचे राज्य असून लवकरच येथूनही काहीतरी वाईट बातमी कानावर येऊ शकते, अशी भीती त्याने व्यक्त केली होती.
आपल्या व्हिडीओत त्याने भूषण कुमारवरही शरसंधान साधले होते.
भूषण कुमारच्या वतीने आता त्याच्या पत्नीने सोनू निगमच्या आरोपांना तपशीलवार उत्तर दिले आहे. तसे करताना तिने सोनूवर बोचरी टीका केली आहे. सोनू निगम दिल्लीतल्या रामलीलात पाच रुपयांवर गाणे म्हणत होता. टी सीरीजचे मालक गुलशन कुमार यांनी त्याला हेरले. त्याचे विमानाचे तिकीट काढून त्याला बोलावले आणि तुला मोठा गायक बनवेल असे सांगितले व तसे केले.
आज सोनू निगम स्वत: लिजेंड आहे. त्याने किती जणांना मदत केली, कोणासाठी काम मागितले, स्वत:च्या पलीकडे कोणाचा विचार केला अशा प्रश्नांची सरबत्ती दिव्या खोसलाने केली आहे. दिव्या खोसला ही गुलशन कुमार यांची सून आहे.
टी सीरीजने नेहमीच नव्या कलाकारांना संधी दिली आहे. मी माझ्या स्वत:च्या चित्रपटांत दहा नव्या कलाकारांना संधी दिली होती. आमच्याकडे काम करणारे 70 टक्के कलाकार बाहेरचे आहेत. याउलट सोनू निगम यांनी त्या घटनेनंतर (गुलशन कुमार यांची हत्या) लगेचच आपला रंग बदलला आणि दुसऱ्या कंपनीशी संधान साधले अशी टीका त्यांनी केली.