पिंपरी – बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवलेला रेशनिंगचा 23 लाखांचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने रुद्राक्ष चायनीज ऍण्ड रेस्टॉरंट, गणपती मळा, सोमाटणे फाटा, तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. 27)ही कारवाई केली.
स्वरुप हनुमंत पाटणकर (वय 38, रा. माळेगाव पुणे) असे आरोपीचे नाव आहे. पाटणकर हा शासकीय रेशनचे गहू व तांदूळ अनाधिकृतपणे विक्री करुन नफा कमवत आहे. त्यासाठी त्याने रेशनच्या मालाचा साठा करून ठेवला आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली.
या छाप्यात पाटणकर याच्या ताब्यातून प्रत्येकी 50 किलो वजनाच्या तांदळाच्या 680 व गव्हाच्या 640 गाण्या तसेच एक शिलाई मशीन, आठ रीळ धागा असा एकूण 23 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. श्री. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाने केली.