सोशल मीडिया : दुधारी शस्त्र

विधायक कामांसाठी सोशल मीडियाचा वापर नक्कीच चांगला

सोशल मीडियाचा वापर हे दुधारी शस्त्र झाले आहे. काही तरुणी समोरच्या व्यक्तीला न भेटता, फक्तफेसबुकवरील चॅटिंगवरून जेव्हा फसवणुकीला बळी पडतात तेव्हा सोशल मीडियाची दुसरी काळी बाजू उघडकीस येते. फसवणूक झालीच, तर बदनामीच्या कारणाला न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे. आभासी जग असले, तरी त्यातून लोक जोडले गेले आहेत. त्याचा योग्य वापर, याचे भान राहिले पाहिजे.

सध्याच्या काळात सोशल मीडिया हा समाजाचा आरसा झाला आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या, वाईट गोष्टी आवर्जून फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा विविध अ‍ॅप्सवर शेअर केल्या जात आहेत. या आभासी जगाची आता सर्वाना भुरळ पडू लागली आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. कुटुंब, शाळा, कॉलेज, पदवीचे शिक्षण, क्लासच्या ठिकाणी, नोकरी, जीम, बागांमध्ये असलेले ग्रुप, अशा एक ना अनेक ठिकाणी भेटलेल्या, जोडले गेलेल्या लोकांना सोशल मीडियाने आणखी जवळ आणले असले, तरी त्यातून होणारे बेबनाव, गैरवापर, त्रास देणे, बदनामी होणे, या त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागते आहे.

ओळख निर्माण करण्याच्या नादात, असलेल्या ओळखी टिकविण्यासाठी, नाती टिकविण्यासाठी आणि मुख्य म्हणजे आपल्यात संवाद होऊन तो टिकावा, त्यातून सुसंवाद घडत राहावा, या गरजेपोटी बोलणे होत राहते. ते वाढत जाते. त्यातून निर्माण झालेल्या विश्वासातून, तर कधी प्रभावित करण्यासाठी वैयक्तिक फोटो आणि माहिती शेअर केली जाते. त्याचाच कधीतरी गैरवापर होतो आणि त्यातून होणा-या त्रासाला तोंड द्यावे लागते. आपल्याच चुकीमुळे किंवा आपली माहिती चोरून, अकाउंट हॅक करून त्रास दिला जातो, तेव्हा तक्रार करण्यास महिला आणि मुली धजावत नाहीत. त्याचा त्रास त्यांना सहन करत बसावा लागतो.

सोशल मीडियावर आपली माहिती देऊन अनेकांना विविध प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागले आहे. तरुण मुलगे, मुलींना ब्लॅकमेल केले जाते. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले जातात. त्याचवेळी त्याचे फोटो आणि व्हीडिओ काढले जातात, नंतर ते व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. अशा प्रकारांमुळे काहींनी आत्महत्या केल्याचेही प्रकार घडले आहेत.

सोशल मीडियाच्या या जगात पोस्ट, लाइक्सची चढाओढ आहे. त्या नादात चुकीची माहिती शेअर होणे, गॉसिप होणे असे प्रकार होतात. आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे; परंतु येथे व्यक्त होताना त्याच्या परिणामांचा विचार केला जात नाही. त्यातून अफवा पसरतात, गैरसमज होतात. सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला, तर तो नक्कीच चांगला आहे; मात्र त्यातून अनेकदा विध्वंसक कृत्येही केली जातात.

आपण व्यक्त होण्याचे माध्यम आपल्या हाती आले आहे. सोशल मीडियाचा सुकाळ होण्यापूर्वी व्यक्तहोण्याची माध्यमे मर्यादित होती. त्यातून मिळणारा आनंद वैयक्तीक होता. आता आपला आनंद सार्वजनिक करताना अनेकदा भान सुटते. सोशल मीडियाचा वापर हे दुधारी शस्त्र झाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.