पुणे, दि. 2 -फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सपसह सगळीकडेच शनिवारपासून चांदणी चौक पूल चर्चेत आहे. पूल पाडण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात आलेले नियोजन ते पूल पडला येथपर्यंत इत्यंभूत माहिती व्हायरल होत आहे. हा अवघ्या 30 मीटरचा पूल पाडताना चीनची भिंतच पाडायची आहे! असा आव आणला जात असल्याचे मेसेज सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. तेव्हाचं युद्ध पानिपतऐवजी बावधनला ठेवलं असतं तर अब्दाली चांदणी चौकातूनच घाबरुन परत गेला असता!’ असं म्हणून पुणेकरांनी चांदणी चौकाच पाडकाम सोसलं नाही म्हणून साशेल मिडियावर त्रागा केला आहे.
पुणे शहरातला पूल असल्याने तो पाडायचा तर एवढी तयारी कशाला पाहिजे? पुणेकरांनी चार-दोन टोमणे मारले तरी पूल पडेल, या टोमण्याची भर पडली. शनिवारी (दि.1) रात्री 1 ते 2 दरम्यान पूल पाडणार असल्याने पुणेकर चांदणी चौकातील रहिवाशांकडून आमच्या येथे चांदणी चौक पूल पडताना लाइव्ह पाहण्याची सोय करण्यात आली आहे. खिडकीतून पाहण्याचे 500 रुपये तर गच्चीवरुन पाहण्याचे 1000 रुपये. या शुल्कामध्ये – चहा-कॉफी-बाकरवडी वगैरे समाविष्ट नाही, अशी एक तिरकस पुणेरी पाटीही सोशल मीडियावर पहायला मिळाली. प्रत्यक्ष पूल पाडण्यासाठी घडवून आणलेल्या स्फोटानंतरही पूल संपूर्ण पडलाच नाही, त्यामुळे मागच्या दिवाळीतले सादळलेले फटाके वापरले होते का! असा पुणेरी टोमणाही मारला गेला. पूल गिरा नहीं-पूल गिरते नहीं, अशी कोटीही मोठ्या प्रमाणात शेअर आणि लाइक करण्यात आली.
पूल पाडण्यापूर्वी चीनच्या भिंतीच्या आठवणी जागवण्यात आल्या, तशा पूल पाडल्यानंतर बर्लिनच्या भिंतीच्या आठवणींनाही उजाळा सोशल मीडियावर देण्यात आला. जर्मन नागरिकांनी बर्लिन वॉलचे तुकडे आठवण म्हणून घरी नेले, तसे चांदणी चौक पुलाचे तुकडे पुणेकरांनी घरी नेले तर साफसफाई लवकर होईल आणि रस्ता मोकळा होईल, असाही एक फॉरवर्ड मसेस मोठ्या चर्चेत आहे. पूल पाडण्याचे काम प्रत्यक्ष चांदणी चौकात पार पडले असले तरी खऱ्या अर्थाने तो सोशल मीडीयावरच मिम्स्च्या रूपात पडला, अशीच चर्चा पुणेकरांत आहे.