नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल बुधवारी १० दिवसांच्या विपश्यनेसाठी अज्ञात स्थळी रवाना झाले. त्यामुळे त्यांची ईडी चौकशी दुसऱ्यांदा टळण्याची चिन्हे आहेत.
दिल्लीतील मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना समन्स बजावले. त्यांना उद्या (गुरूवार) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, ते पूर्वनियोजित विपश्यनेसाठी रवाना झाल्याची माहिती आपच्या सुत्रांनी दिली.
केजरीवाल नियमितपणे विपश्यनेत सहभागी होतात हे सर्वांनाच ठाऊक आहे. यावेळी ते मंगळवारीच विपश्यनेसाठी रवाना होणार होते. मात्र, इंडिया आघाडीच्या बैठकीमुळे त्यांचा दौरा एक दिवसाने लांबणीवर पडला, असे त्या सुत्रांनी नमूद केले.
ईडीने याआधी २ नोव्हेंबरला केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, ईडीचे समन्स अवैध आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याची भूमिका घेत ते चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे ईडीने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले. मद्य धोरण घोटाळ्यासंदर्भात याआधीच मनीष सिसोदिया आणि संजय सिंह या आपच्या नेत्यांना अटक झाली आहे.