पुणे – महापालिकेत शनिवारी झालेल्या धक्काबुक्कीत जखमी झाल्यानंतर आयुक्तांना न भेटताच गेलेले भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या रविवारी व्हीलचेअर वरून महापालिकेत आले. त्यावेळी त्यांनी जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहाराची तक्रार केली आणि मुंबईच्या दिशेने रवाना झाले.
शनिवारी सोमय्यांना संचेती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्या हात आणि माकडहाडाला मार लागला आहे. त्यांच्या हाताला बॅंडेज लावण्यात आले आहे. त्या अवस्थेतही सोमय्या यांनी रविवारी सकाळी नऊ वाजता डिस्चार्ज मिळाल्यानंतर थेट महापालिका गाठली. दरम्यान, रविवारी सोमय्या महापालिकेत आल्यानंतर मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली होती.
सोमय्या हे शनिवारी महापालिकेत आले असताना महापालिकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा अशी मागणी करत शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यामध्ये सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवरून पडले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूला आणून गाडीत बसवले. त्यानंतरही त्यांच्या गाडीच्या काचांवर शिवसैनिकांनी हात, पायांनी ठोसे मारले.
जखमी सोमय्या यांना संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संचेतीमध्ये जाऊन सोमय्यांची विचारपूस केली होती. यानंतर सोमय्यांनी ट्विट करत शिवसैनिकांवर निशाणा साधला होता.