मंचर, (प्रतिनिधी) – मंचर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी आपल्या दोन मुलींबरोबर सह्याद्रीतील डोंगररांगांमध्ये असलेल्या अवघड आणि खडतर असलेला पहिले नवरा सुळका सर केला. त्यांनी पार पाडलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सह्याद्रीतील डोंगररांगांमध्ये असणारे अनेक डोंगरकडे, किल्ले, शिखर, सुळके हे प्रत्येक गिर्यारोहकाला चढाईसाठी भुरळ घालत असतात. त्र्यंबकेश्वर पर्वत रांगेतील पहिले नवरा सुळकाही त्यापैकीच एक गेल्या अनेक वर्षांपासून गिर्यारोहण, ट्रेकिंगची आवड असलेले मंचर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव यांनी आपल्या दोन मुली नियती जाधव वय १३, काव्या जाधव वय १० यांच्याबरोबर २६० फूट उंची असलेला अवघड श्रेणीचा पहिले नवरा सुळका सर केला आहे.
या मोहिमेत अरोहण क्लाइबिंग रॅपलिंग आणि जंगल ट्रॅक यांचा समावेश होता. सुळका सर केल्यानंतर सुळक्याच्या माथ्यावरून दिसणारे गड किल्ले हरिहर, बसगड, ब्रह्मगिरी पर्वत, अंजनेरी पर्वत, नवरा नवरी किल्ला, मेटघर येथील संडे वन व संडे दोन सुळका, फण्या, डांग्या सुळका, कोथळा मोथळा, असा हा सह्याद्रीचा परिसर आपल्याला मन मोहन करुन टाकतो, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी सांगितले. जाधव यांच्यासह त्यांच्या मुलींनाही गिर्यारोहणाची आवड असून पुढील काळातही या प्रकारे अनेक किल्ले, गड, सुळके सर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.