कर्जत/जामखेड – कर्जत-जामखेड तालुक्यातील महिला सक्षमीकरणाचा शब्द देऊन आमदार झालेले रोहित पवार हे आपला शब्द पाळत असल्याची आकडेवारी पुढे आली आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात भरलेल्या भिमथडी जत्रेत सहभागी झालेल्या कर्जत व जामखेड या दोन्ही महिला बचत गटांनी तब्बल ३८ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. यामुळे महिलांच्या कष्टाला फळ मिळालेच पण त्यांचा उत्साहही द्विगुणित झाला आहे.
विधानसभेच्या निवडणूक प्रचारापासून तर आजही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये रोहित पवार हे महिला सक्षमीकरणावर बोलत असतात. महिला सक्षम झाली तर ते कुटुंब सक्षम होत असते, त्यामुळे तिच्या कष्टाला मोल मिळाले पाहिजे, अशी त्यांची नेहमी भूमिका असते.
त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार या तर गेल्या वीस वर्षाहून अधिक काळापासून महिला सक्षमीकरणासाठी काम करत आहेत. या दोघा माय-लेकाने कर्जत-जामखेड तालुक्यातही महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम हाती घेतले आहे.
त्यानुसार गेल्या आठवड्यात ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’मार्फत पुण्यात भरविण्यात आलेल्या ‘भिमथडी जत्रे’त कर्जत-जामखेड तालुक्यातील ३७ महिला बचत गटांनी आपले स्टॉल थाटले होते. यामध्ये कर्जतच्या प्रसिद्ध शिपी आमटीपासून तर गावराण चिकन-मटण, शाकाहारी जेवणात थालीपीठ, शेंगोळे,
वांग्याचे भरीत, झुणका-भाकर, दही धपाटे आदी विविध प्रकारच्या जेवणाचा समावेश होता. त्याशिवाय घरगुती वापराच्या लाकडी वस्तू, विणकाम केलेल्या वस्तू, कोल्हापुरी चप्पल, पापड, कुर्डई, शेवई, नाचणीची पापडी, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, लोणची असे अनेक पदार्थ आणि वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या होत्या.
पुणेकरांनी या वस्तूंना आणि खाद्य पदार्थांना आपली पसंती दर्शवत भरभरुन खरेदी केली आणि शाकाहारी व मांसाहारी जेवणाचाही पोटभर आस्वाद घेतला. त्यामुळे काही बचत गटांच्या स्टॉलवरील माल तर पहिल्या दोन-तीन दिवसांतच संपला.
ग्राहकांच्या या अभूतपूर्व प्रतिसादाने बचत गटांच्या महिलांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे हास्य पसरले. विशेष म्हणजे यातील जवळपास ९५ टक्के बचत गट ‘भिमथडी जत्रे’त पहिल्यांदाच सहभागी झाले होते आणि या बचत गटातील महिलांनाही यामुळे ‘पुणे’ बघण्याची संधी मिळाली.
अखेरचे दोन दिवस तर आमदार रोहित पवार यांनी पूर्ण दिवस भिमथडी जत्रेत उपस्थित राहून मतदारसंघातील प्रत्येक बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन महिलांशी संवाद साधला, त्यांची विचारपूस केली. यामुळे बचत गटाच्या महिलांचाही उत्साह वाढला होता. ‘ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट’च्या विश्वस्त आणि भिमथडी जत्रेच्या संयोजक सुनंदाताई पवार यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे या जत्रेचे आयोजन केले होते.
‘भिमथडी जत्रे’च्या माध्यमातून त्यांनी महिला बचत गटांना एक व्यासपीठ निर्माण करुन दिले. कोणाला काही अडचण असेल तर प्रत्येकजण सुनंदाताई पवार यांच्याशी संपर्क साधत आणि त्याही तेवढ्याच तत्परतेने प्रतिसाद देत त्यांची अडचण सोडवताना दिसत होत्या.
संधी देणे हे आपल्या हातात असते. पण मिळालेल्या संधीचे सोने करणे हे संधी मिळालेल्यांच्या हातात असते. बचत गटातील महिला भगिनींमध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करुन दाखवल्याचे यानिमित्ताने पहायला मिळाले. भविष्यातही महिलांना अधिक मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या संधी उपलब्ध करुन देण्यात येतील.
– रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)