चंडिगढ – कॉंग्रेसचे पंजाब प्रदेशाध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू हे 44 कोटींहून अधिक रूपयांच्या मालमत्तेचे धनी आहेत. त्यांच्याकडे काही आलिशान वाहने आणि मौल्यवान घड्याळेही आहेत.
सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासमवेत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी मालमत्तेची माहिती दिली आहे. त्यांच्या आणि पत्नीच्या नावे अनुक्रमे 3.28 कोटी रूपये आणि 41.35 कोटी रूपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे.
अमृतसरमध्ये त्यांची सुमारे 34 कोटी रूपयांची निवासी मालमत्ता आहे. पतियाळात त्यांचे 1.44 कोटी रूपयांचे वडिलोपार्जित घर आहे. त्याशिवाय, पतियाळात त्यांच्या मालकीची सहा शोरूम्स आहेत. त्यांच्याकडे 1 कोटी रूपयांहून अधिक किमतीची दोन टोयोटा लॅंड क्रुझर वाहने आहेत. त्याशिवाय, त्यांच्याकडे 44 लाख रूपयांची घड्याळे आहेत.
सिद्धू यांनी उत्पन्नाचे स्त्रोतही नमूद केले आहेत. त्यामध्ये आमदार म्हणून मिळणारे वेतन, भाडेपट्ट्यातून मिळणारी रक्कम आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्राप्त होणाऱ्या पेन्शनचा समावेश आहे.