दुबई :- आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली व शुभमन गिल यांनी प्रगती केली आहे. पहिल्या दहा खेळाडूंच्या यादीत या तिघांनीही स्थान मिळवले आहे.
सलामीवीर गिलने कारकिर्दीत पहिल्यांदाच या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आशिया करंडक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध नाबाद शतक फटकाणारा कोहली तसेच संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण धावा करत असलेल्या रोहितने अनुक्रमे आठवे व नववे स्थान मिळवले आहे.
आशिया स्पर्धा पार पडल्यावर भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार असून, त्यानंतर मायदेशातच एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा खेळणार असल्याने या खेळाडूंसह भारतीय संघातील अन्य खेळाडूंनाही क्रमवारीत प्रगती करण्याची संधी मिळणार आहे.