- खराळवाडीतील पुरुषासह एका 80 वर्षीय वृद्ध महिलेचा समावेश; करोनाबाबत संदिग्धता
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोना बाधितांचा आकडा वाढत असतानाच महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात शहरवासियांची चिंता वाढविणारी घटना समोर आली आहे. काल (शनिवारी) उपचारासाठी दाखल झालेल्या दोघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये खराळवाडी येथील एका 55 वर्षीय इसमाचा, तर सध्या शहरात राहणाऱ्या मात्र मूळच्या रायगड येथील असलेल्या 80 वर्षीय वद्धेचा समावेश आहे. मृत्यूबाबत “वायसीएम’ प्रशासनाने दुजोरा दिला असला तरी संबंधित रुग्ण करोना बाधित नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या रुग्णांना शुक्रवारी करोना संशयितांच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते.
पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज रविवारी (दि. 19) बाधितांचा आकडा 62 वर पोहोचला आहे. शनिवारी (दि. 18) रोजी हा आकडा 61 इतका होता, तर रविवारी पिंपळे सौदागर येथील एका 25 वर्षीय महिलेला लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा आकडा आता 62 वर पोहोचला आहे. याशिवाय “वायसीएम’ रुग्णालयात सध्या अनेक संशयितांवर उपचार सुरू आहेत.
शनिवारी पहाटे मूळच्या रायगड येथील मात्र सध्या पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या एका 80 वर्षीय महिलेला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना “वायसीएम’मध्ये दाखल करण्यात आले होते. दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. तर सर्दी, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने खराळवाडी येथील एका 55 वर्षीय पुरुषास वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. संबंधिताचा मृत्यू साडेसातच्या सुमारास झाला.
या दोघांनाही करोना संशयितांच्या वॉर्डात दाखल करण्यात आले होते. दोघांवर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या दोघांच्या मृत्यूबाबत वायसीएम प्रशासनाने शनिवारी कोणतीही माहिती जाहीर केली नाही. दोन्ही मृतांचे शवविच्छेदन करण्यात न आल्यामुळे त्यांच्या करोना संशयाबाबत शक्यता बळावली असली तरी वायसीएम प्रशासनाने मात्र दोघेही करोना “निगेटिव्ह’ असल्याचे सांगितले आहे.
माहिती लपविल्याने अधिक संशय
वायसीएम रुग्णालय हे पूर्णत: करोनाबाधित आणि संशयितांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. या ठिकाणी केवळ करोनाच्या संशयितांवरच उपचार करण्यात येत आहे. अन्य रुग्णांसाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार घेत आहेत, असे असतानाही या रुग्णांना वायसीएम रुग्णालयातील करोना संशयितांच्या वॉर्डात दाखल करण्यात आले. दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन न करता त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे करोबाबत संशय अधिक बळावला आहे. तर माहिती का लपविले जात आहे? याबाबतही अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
दोघेही करोना “निगेटिव्ह’
शनिवारी मृत्यू झालेले दोघेही करोना “निगेटिव्ह’ असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली. ते म्हणाले की, दोन्ही रुग्णांना हे अत्यंत शेवटच्या क्षणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 80 वर्षीय महिला ही बेशुद्ध अवस्थेत होती. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला, तर खराळवाडी येथील पुरुषाचे केवळ ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण झाली होती. उपचार करण्यास सुरुवात होण्यापूर्वीच हा रुग्ण दगावला. दोघांना छातीचे, फुफ्फुसाचे अथवा अन्य आजाराची लक्षणे पूर्वीपासूनच असावीत.