पालघर – पालघर जिल्ह्यातील तलासरीमधील जंगलात 5 फेब्रुवारीला जळालेल्या अवस्थेत नौदल कर्मचारी सुरज कुमार दुबे आढळून आले होते. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाने डहाणूनंतर मुंबईच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चेन्नई विमानतळावरून अपहरण करून त्यांच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद सुरज कुमार यांनी मृत्यूपूर्वी पोलिसांना दिली. त्यानंतर पालघर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दहा टीमकडून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. मात्र, या तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
नौदल कर्मचारी सुरजकुमार दुबे यांचे खंडणीसाठी अपहरण झाले नसून त्यांनी स्वतः हा बनाव केला असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सुरजकुमार दुबे यांनी शेअर मार्केटमध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली असून या गुंतवणुकीत त्यांच मोठे नुकसान झाले होते. तसेच सुरजकुमार दुबे यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून लाखो रुपयांचे कर्जही घेतले होते. एका महिन्यामध्ये सुरजकुमार दुबे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून तब्बल 17 लाख रुपयांच्या आसपास कर्ज घेतले होते तर पोलिसांनी मागवलेल्या सीबीचा रिपोर्टप्रमाणे जवळपास तेरा बॅंकांकडे कर्जाची मागणी केली होती.
या प्रकरणात चेन्नई आणि तलासरी येथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरजकुमार दुबे मुक्त विहार करत असल्याचे दिसून आले आहे. तर तलासरी येथील एका पेट्रोल पंपवरून त्यांनी तीनशे रुपयांचे डिझेल बाटलीत खरेदी केल्याचे उघड झाले आहे. मृत्युपूर्वी सुरज कुमार दुबे यांनी दिलेली फिर्याद ही खोटी असल्याचे उघड होत आहे.