रोम – इटलीमध्ये एका तरुणीला फायझर लसीचे एकाच वेळी तब्बल सहा डोस देण्यात आल्याने चांगलीच धावाधाव झाली. मात्र तिला निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर सोमवारी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून लसीचा कोणताही विपरीत परिणाम तिच्यावर झाला नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
लसीचे सहा डोस देण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर 23 वर्षीय तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी तरुणीला लसीचे डोस देण्यात आले. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्याने चुकून लसीची संपूर्ण बाटली मोकळी करत तरुणीला डोस दिले. या बाटलीत एकूण सहा डोस होते. आरोग्य कर्मचाऱ्याला सहा सिरिंज मोकळ्या दिसल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
तरुणीला सहा डोस देण्यात आल्याने तिच्या रोगप्रतिकारक प्रतिसादावर डॉक्टर लक्ष ठेवून असतील अशी माहिती प्रवक्त्याने दिली आहे. ही तरुणी रुग्णालयातील मानसोपचार विभागात इंटर्न म्हणून काम करते. याप्रकरणी चौकशी आदेश देण्यात आले असून प्रवक्त्यांनी ही मानवी चूक असून जाणुनबुजून करण्यात आले नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, तिच्यावर आतातरी काही विपरित परिणाम झाले नसल्याचे डॉ. अन्तेनोला विसेन्टी यांनी म्हटले आहे. ज्यांना फारझरचे पाच डोस देण्यात आले त्यांच्यावर कोणताही गंभीर परिणाम झाला नसल्याचे फायझरच्या अभ्यासात आतापर्यंत आढळून आले आहे. इस्त्रायल आणि जर्मनीतही अनवधानाने अशा घटना घडल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.