पिंपरी – शहरवासियांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना नदीत चिकन वेस्ट टाकण्यासाठी हिंजवडीतून आलेल्या एका टेम्पो चालकाला सुरक्षा रक्षकाने रंगेहाथ पकडले. हा धक्कादायक प्रकार पवना नदीतील रावेत येथील जलउपसा केंद्राजवळ घडली. याप्रकरणी टेम्पो चालकासह चिकन दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया (दि.28) रोजी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा होतो. धरणातून पवना नदीत पाणी सोडले जाते. महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलते. हे पाणी निगडीतील सेक्टर 23 येथे शुध्दीकरण करून शहरात वितरित करण्यात येते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून पवना नदीत अज्ञात व्यक्ती चिकन वेस्ट टाकत असल्याच्या तक्रारी विविध संघटनांनी महापालिकेकडे केल्या होत्या. पिण्याच्या पाण्यातच चिकन वेस्ट टाकण्याच्या या प्रकाराची महापालिकेने गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे महापालिकेच्या वतीने रावेत येथील उपसा केंद्राजवळ सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. सुरक्षा रक्षक नेमल्यानंतर एक-दोनदा चिकन वेस्ट टाकण्याचा प्रकार घडला होता.
त्यामुळे महापालिकेच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास हिंजवडी येथून एका टेम्पोमधून एक जण सुमारे 400 किलो चिकन वेस्ट पवना नदीत टाकण्यासाठी घेऊन आला होता. मात्र, रावेत येथील स्मशानभूमीतील सुरक्षा रक्षकाने हा टेम्पो पाहिल्यानंतर पोलीस आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरीत कळविले. पोलिसांनी आरोपीला टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
पवना नदीवरील रावेत बंधाऱ्याच्या खालच्या भागात गेल्या काही दिवसांपासून नदीत चिकन वेस्ट टाकण्याचे प्रकार घडत होता. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारी घेण्यात येत होती. त्यानंतरही दोन-तीन वेळा चिकन वेस्ट टाकण्याचे प्रकार घडले होते. मात्र, सोमवारी रात्री सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे चिकन वेस्ट टाकण्यासाठी आलेल्या टेम्पो चालकाला रंगेहाथ पकडले. तसेच यापुढील काळात नदी पात्रात अशा प्रकारे कोणी काही टाकत असल्यास नागरिकांनी महापालिकेला कळवावे.
– डॉ. अनिल रॉय, आरोग्य वैद्यकीय अधिकारी