पुणे – करोना रुग्ण संख्या वाढत असतानाच शिवाजीनगर न्यायालयातील गर्दी वाढली आहे. पूर्णवेळ काम सुरू झाल्यापासून पक्षकार, पोलीस आणि वकिलांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे न्यायालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. यातच न्यायालयामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी कोणत्याच सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत.
गतवर्षी करोनामुळे जिल्हा न्यायालयाचे कामकाज नऊ ते दहा महिने बंद होते. कामकाज सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कमी वेळेत असायचे. आता पूर्ववत करण्यात आले. इतके महिने न्यायालयाचे कामकाज बंद राहिल्यामुळे प्रलंबित खटले मार्गी लावण्यासाठी वकील, पक्षकारांची रेलचेल वाढली आहे. समन्स, वॉरंट बजावण्यासाठी अथवा साक्षीदारांना हजर करण्यासाठी पोलिसांचीही न्यायालयात धावपळ पाहायला मिळते. आरोपीला न्यायालयात आणल्यावर त्यांचे नातेवाईकही येतात.
न्यायालयात प्रवेश न दिल्यास बाहेर थांबतात. त्यामुळे न्यायालयाच्या बाहेरही गर्दी होते. वकिलांकडून मास्कच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मात्र, न्यायालयात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींकडून मास्क चेहऱ्यापेक्षा हनुवटीवरच अधिक वेळ आहे. त्यामुळे न्यायालयात करोनाचा शिरकाव होण्यास वाव आहे. पुणे बार असोसिएशनने न्यायालयात गर्दी न करण्याचे वारंवार आवाहन करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पोलिसांकडून वॉरंट किंवा समन्स बजावण्यात आला तर
पक्षकारांना न्यायालयात यावेच लागते. बहुतांश गर्दी ही आरोपींसमवेत येणाऱ्या लोकांचीच अधिक असते. त्या लोकांना न्यायालयात येऊ नका, असे सांगण्यात आले आहे. न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर देखील पोलिसांनाही विनाकारण आलेल्या व्यक्तींना आत सोडू नये अशा सुचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक हॉलमध्ये जाऊन आम्ही वकिलांनी गर्दी करू नये असे सांगत आहोत.– ऍड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन