देहरादून – दिल्लीहून देहरादूनला निघालेल्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका डब्याने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची एकच भंबेरी उडाली. शताब्दी एक्स्प्रेसच्या सी-5 डब्याला ही आगा लागली होती. परंतु, या आगीमुळे कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार शताब्दी एक्स्प्रेसच्या ज्या बोगीत आग लागली होती त्या डब्यातून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. कोणत्याही प्रवाशाला कोणत्याही प्रकारची हानी या अपघातामुळे झालेली नाही. दिल्लीहून देहरादूनला निघालेल्या 02017 अप शताब्दी एक्स्प्रेस रेल्वेमध्ये हरिद्वारनजीक कंसरो स्टेशनजवळ आग लागली. आगीने अगदी काही क्षणातच उग्र रूप धारण केले. सी-5 डब्यातून आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा बाहेर पडू लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
रेल्वे अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार राईवाला आणि कसरो रेल्वे स्टेशनदरम्यान दुपारी 12 च्या सुमारास ही घटना घडली. रेल्वेत आग लागल्याची सूचना मिळाल्यानंतर तातडीने रेल्वे अधिकार्यांना याची माहिती देण्यात आली. फायर ब्रिगेडला कळवण्यात आले. फायर ब्रिगेडच्या कर्मचार्यांनी मोठ्या प्रयत्नांनी रेल्वेत लागलेल्या आगीवर अतिशय कमी वेळेत नियंत्रण मिळवले. ज्या डब्याला आग लागली होती तो डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला. या डब्यातील प्रवाशांना दुसर्या डब्यात जागा देण्यात आली आणि रेल्वेला पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले. आग लागलेल्या डब्यात एकूण 35 प्रवासी होते.
शताब्दी एक्स्प्रेसला लागलेल्या या आगीमुळे धर्मेंद्र, जितेंद्र आणि विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या दि बर्निंग ट्रेन या चित्रपटाची प्रवाशांना आठवण झाल्याशिवाय राहिली नसेल.