राजे समर्थकांमध्ये उत्साह; देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांची उपस्थिती
सातारा – राज्यसभेच्या येत्या 26 मार्च रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी दुपारी एक वाजता मुंबईत आपला अर्ज दाखल केला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यावेळी उपस्थित होते. माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजकीय पुनर्वसनाचे प्रयत्न भाजपच्या वतीने सातत्याने सुरू होते. राज्यसभेची उमेदवारी उदयनराजे यांना मिळणार का, हा औत्सुक्याचा विषय होता. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर भाजपच्या कोट्यातील तीनपैकी एका जागेवर उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आले.
गुरूवारी दुपारी एक वाजता विधानसभेत निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांकडे उदयनराजे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उदयनराजे यांच्या अर्जावर देवेंद्र फडणवीस (दक्षिण नागपूर), आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), भीमराव तापकीर (खडकवासला), पराग अळवणी (विलेपार्ले), सुरेश खाडे (मिरज), सुरेश भोळे (जळगाव शहर), कालिदास कोळंबकर (वडाळा), राहुल आहेर (चांदवड), मंदा म्हात्रे (बेलापूर), देवराव होळी (गडचिरोली) यांनी प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे.
येत्या 26 मार्च रोजी होणाऱ्या टप्प्यात राज्यसभेवर 59 उमेदवार निवडून दिले जाणार आहे. भाजपने उदयनराजे यांना राज्यसभा सदस्यत्वाचा दिलेला शब्द खरा केला आहे. भाजपचे विधानसभेत 105 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले, रामदास आठवले यांची निवड निश्चित मानली जात आहे. राजे समर्थक उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, ऍड. दत्ता बनकर, नगरसेवक मनोज शेंडे आदींनी मुंबईत तळ दिला होता. उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजे समर्थकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.