कन्नूर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती कमिटीच्या सदस्या एम.सी.जोसेफी यांचे आज खासगी हुग्णालयात निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या 23 व्या अधिवेशनाला उपस्थित असतानाच शनिवारी रात्री जोसेफी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
जोसेफी या दोन दशकांपासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल कमिटीच्या सदस्या होत्या. 2017 पासून 2021 पर्यंत त्या केरळ महिला आयोगाच्या अध्यक्षाही होत्या. गेल्यावर्षी जूनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करणाऱ्या महिलेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांना हे पद सोडावे लागले होते. माक्सवादी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित जनाधिपती महिला संघटनेच्याही त्या राष्ट्रीय उपाध्यक्षाही होत्या.
1970 मध्ये विद्यार्थी चळवळीपासूनच जोसेफी या कम्युनिस्ट पक्षाशी जोडल्या गेल्या होत्या. केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांपैकी त्या एक होत्या. लाकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत पराभूत झाल्यामुळे त्या कधीही लोकप्रतिनिधी होऊ शकल्या नाहीत.