सातारा – हिंदकेसरी विनोद चौगुले याच्यानंतर तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा कोल्हापूरला मिळाली. पृथ्वीराज पाटील याच्या रूपाने हा मान मिळाला. चौगुले यानी 2000 साली महाराष्ट्र केसरीची गदा मिळवली होती.
पृथ्वीराज पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचा असून, त्याचे आजोबा मारुती गणपती पाटीलदेखील कुस्तीपटू होते. गावातल्या तालमीत त्यांनी तालमीत कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराजचे वडील बाबासाहेब पाटील यांना मात्र कुस्तीत फार चमक दाखवता आली नाही. मात्र, मुलाने कुस्तीत नाव कमवावे अशी त्यांची इच्छा होती. पृथ्वीराज 2009 साली मोतीबाग तालमीत दाखल झाला. महान भारत केसरी दादू चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कुस्तीतील वाटचाल सुरू झाली.
पृथ्वीराज 2014 साली शिंगणापुरातील शाहू कुस्ती केंद्रात दाखल झाला. प्रशिक्षक जालंदर मुंडे यांनी त्याला सर्वोत्तम प्रशिक्षण दिले. त्याने 2021 साली वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, तर 2022 साली ब्रॉंझपदक पटकावले. खेलो इंडिया स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक मिळवले. 2019 साली महाराष्ट्र केसरीच्या 92 किलो गटातही उतरला होता. त्यातही त्याने सुवर्णपदक पटकावले. त्यानंतर तो थेट महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी मैदानात उतरला आणि किताबाचा मान मिळवला.