पुणे – वैद्यकीय शिक्षणाच्या (एमबीबीएस) चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी परीक्षेच्या टेन्शनमध्ये वडिलांना सोडून निघून गेला. मात्र, त्याला फरासखाना पोलिसांनी अथक प्रयत्नांनंतर शोधून काढले. लोणावळा येथे तो सापडला. केवळ सीसीटीव्हीच्या मदतीनेच हा शोध लागला.
मुकूल युवराज चव्हाण (24, सानपाडा, नवी मुंबई) असे तरुणाचे नाव आहे. बी. जे. मेडीकल कॉलेजमध्ये तो एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. तो हॉस्टेलमध्येच राहतो. त्याची आठ सप्टेंबरपासून परीक्षा सुरू होणार आहे. मात्र, त्याचा अभ्यास पूर्ण झाला नव्हता. त्याचे त्याला टेन्शन आले होते. दरम्यान, त्याचे वडील मुंबईवरून त्याला भेटण्यासाठी आले होते. 30 ऑगस्टला हे दोघे दुपारी भेटले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ते आले होते. दर्शन घेत असतानाच मुकूल वडिलांना सोडून गायब झाला. त्याला वडिलांनी शोधले, पण तो सापडला नाही. त्याला फोन लावण्याचा प्रयत्नदेखील केला; पण तो लागला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ फरासखाना पोलिसांकडे धाव घेत हरविल्याची तक्रार दिली. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही पाहिले.
दरम्यान, संगमब्रिजजवळ त्याचा मोबाइल मिळाला. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन व इतरांच्या मदतीने काही तास या नदीपात्रात शोध घेतला; पण तो मिळाला नाही. त्यामुळे पोलीस कर्मचारी सयाजी चव्हाण व आकाश वाल्मिकी या दोघांनी पुढचे सीसीटीव्ही पाहिले असता तो बोपोडीकडे जाताना दिसून आला. लोणावळा येथून त्याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले.
पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, सचिन सरपाले, बापू खुटवड, गणेश आटोळे, दिनेश भांदुर्गे, मोहन दळवी यांच्या पथकाने ही कारवाई केली.