पुणे-टीईटी घोटाळ्याप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेने शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली होती, त्यातील जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या 161 शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून उद्यापासून (दि. 5) करण्यात येणार आहे. सलग तीन दिवस कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.
पुणे पोलिसांनी टीईटी घोटाळा प्रकरण उघडकीस आणला होता. आरोग्य विभागाच्या परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करताना त्यांना टीईटी घोटाळ्याची माहिती दिली, त्यानंतर 2019च्या टीईटीची चौकशी करताना 2018 मधील टीईटीमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने त्यांच्या संकेतस्थळावर तब्बल 8 हजार परीक्षार्थीची यादी प्रसिद्ध करून यांची संपादणूक रद्द करण्यासाठी यापुढे त्यांना ही परीक्षा कधीच देता येणार नाही, अशी कारवाई केली होती.
याप्रकरणी जिल्ह्यातील 161 शिक्षकांची यादी राज्य परीक्षा परिषदेने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिली आहे. झेडपीच्या शिक्षण विभागामार्फत या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी तीन दिवसांत केली जाणार आहे. सोमवारी आणि मंगळवारी प्रत्येकी 60 तर बुधवारी उर्वरित शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे.