डॉ. मेघश्री दळवी
बिया मातीमध्ये पेरल्या, पाणी दिलं की, त्या अंकुरतात. ही झाली तुम्हा आम्हाला माहिती असणारी गोष्ट. पण शास्त्रज्ञ कधीकधी काही सामान्य गोष्टींचा कुतुहलाने अभ्यास करायला घेतात.
विल्यम जेम्स बिल हे अमेरिकन वनस्पतिशास्त्रज्ञ. बिया किती काळ जमिनीत खोलवर राहिल्या तरी त्यांची अंकुरण्याची क्षमता टिकून राहते हा त्यांचा संशोधनाचा विषय. चाळीस-पन्नास वर्षे जुन्या बियांना पाणी मिळाल्यावर त्या रुजतील का, हे त्यांना पाहायचं होतं. त्यासाठी प्रोफेसर बिल यांनी एका दीर्घकाळ चालणाऱ्या प्रयोगाची रचना केली. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये केलेला हा प्रयोग “बील सीड एक्स्परिमेंट’ म्हणून ओळखला जातो.
एकवीस वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींच्या प्रत्येकी पन्नास बिया त्यांनी एका बाटलीत घेतल्या. वाळू टाकून ती पूर्ण भरली आणि तिला क्रमांक दिला एक. मग अशाच आणखी एकोणीस बाटल्या त्यांनी भरल्या. या सगळ्या वीस बाटल्या जमिनीखाली खोल, उलट्या करून पुरल्या. या बाटल्यांना झाकण लावलेलं नव्हतं, मातीचा आणि मातीतल्या ओलाव्याचा बाटल्यांमधल्या वाळूशी संपर्क व्हावा, पण पाणी मात्र साठू नये अशा प्रकारे त्या बाटल्या उलट्या पण किंचित तिरक्या पुरल्या.
ते वर्ष होतं 1879. प्रोफेसर बिल यांचा उद्देश होता, दर पाच वर्षांनी एक बाटली बाहेर काढायची, तिच्यातल्या बिया रितसर पेरून पाणी द्यायचं आणि त्यांना अंकुर फुटतो का, हे पाहायचं. त्यांनी सहा बाटल्या दर पाच वर्षांनी बाहेर काढून अंकुरण्याच्या नोंदी करून ठेवल्या. मग 1910 मध्ये निवृत्त होताना या प्रयोगाची सूत्रं आपल्या सहकाऱ्याकडे, प्रोफेसर डार्लिंग्टन यांच्याकडे सोपवली. त्यानंतर 1920 मध्ये दोन प्रयोगांच्या मधला कालावधी वाढवून दहा वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रत्येक दशकात काही ना काही बिया अंकुरतात ही खूप आशादायक घटना होती. पुढे 1990 मध्ये ज्यांच्याकडे या दीर्घकालीन प्रयोगाची जबाबदारी होती, त्या संशोधकांनी हा कालावधी आणखी वाढवून 20 वर्षे केला. नवीन शतक सुरू होताना, 2000 साली बाहेर काढलेल्या बाटलीतल्या पन्नासपैकी व्हर्बास्कमब्लॅटारियाच्या तेवीस आणि दुसऱ्या, वनस्पतीच्या दोन बियांना अंकुर आले.
पुढची बाटली होती सोळावी, आणि ती उघडायचं वर्ष ठरलं होतं 2020. या वर्षी सगळं जग कोणत्या लढ्यात गुंतलं होतं हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे एक वर्ष उशिरा, 15 एप्रिल 2021 रोजी ही सोळावी बाटली बाहेर काढून त्या बिया समारंभपूर्वक जमिनीत पेरण्यात आल्या. त्यातल्या तेरा बिया अंकुरल्या.
त्या सगळ्या बिया व्हर्बास्कमब्लॅटारिया या एकाच प्रकारच्या वनस्पतीच्या आहेत. प्रोफेसर बिल यांच्या विक्रमी प्रयोगाचं यश म्हणजे एकशे बेचाळीस वर्षे टिकून राहिलेल्या या वनस्पतींच्या बिया! शेवटची बाटली 2100 मध्ये उघडली जाईल तेव्हा नवीन विक्रम होईल का, याचा मागोवा आता पुढल्या पिढ्या घेतील!