पुसेसावळी – महाराष्ट्र सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा व यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट वडगाव उंब्रज यांचे वतीने विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सैनिक समाज यशवंत पुरस्कार प्रदान सोहळा शताब्दी हॉल कराड येथे संपन्न झाला. या गौरव सोहळ्यामध्ये सैनिक समाज यशवंत पुरस्कार कराड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वर्धन अँग्रो कारखान्याचे संचालक सत्वशील कदम यांना सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी माजी आमदार आनंदराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यशवंत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष माजी सैनिक प्रशांत कदम म्हणाले, विविध क्षेत्रांमध्ये सातारा जिल्ह्याच्या मागच्या पिढ्यांनी निश्चितच दमदार कामगिरी केली आहे. अनेकांनी जिल्ह्यात राहून तर काहींनी देशभरात जाऊन आपापल्या क्षेत्रात क्षितिजावर झेप घेतली आहे. सत्वशील कदम यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करून कराड, सैदापूर,आगाशिवनगर, बनवडी,विद्यानगर या परिसरामध्ये आत्तापर्यंत 732 सदनिका 52 रो-हाऊस,12 ट्विन बंगलो,200 बिनशेती प्लॉट आपल्या ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध करून दिले आहेत.
कराड विभागात रेल्वे स्टेशन, विविध शाखेची महाविद्यालये, शिक्षण संस्था, इंग्लिश मीडियम स्कूल, खाजगी क्लासेस, अद्यावत हॉस्पिटल उपलब्ध असल्याकारणाने सैनिक लोक राहण्यासाठी कराड परिसरालाच प्राधान्य देतात. सत्वशील कदम यांनी आजपर्यंत बांधकाम क्षेत्रात केलेल्या कामगिरीमध्ये 30 टक्के घरे सैनिकांसाठी आरक्षित केली आहेत .त्यांचा वर्धन सिटी म्हणून बनवडी येथे मोठा प्रकल्प सुरू असून या प्रकल्पामधील एक संपूर्ण बिल्डिंग त्यांनी खास सवलतीच्या दरात सैनिकांसाठी राखीव ठेवली आहे. सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच सैनिकांसाठी ज्या संवेदनशील पणे कदम काम करत आहेत समाजसेवेचा त्यांनी जो वसा घेतला आहे.त्याची दखल घेणे अनिवार्य आहे.
यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष कराड दक्षिण नितेश जाधव, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, मुख्याधिकारी शंकर खंदारे, शंकर शेजवळ, विशाल शेजवळ तसेच कराड तालुका सैनिक फेडरेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.