चरेगाव – सातारा ते पाटण दरम्यान प्रवासी वाहतूक करणाऱ्या सातारा पाटण एसटीमध्ये कळंत्रेवाडी, ता. कराड गावच्या हद्दीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी गाडीला धक्का देत गाडी सुरू करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र, शेवटी प्रवाशांची घोर निराशाच झाली. त्यामुळे अखेर प्रवाशांनी खाजगी वाहतुकीचा आधार घेतला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, सातारा-पाटण ही प्रवाशांनी खचाखच भरलेली बस सकाळी ठीक 10 च्या सुमारास कळंत्रेवाडी हद्दीत आली असता इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बसमधून जवळपास 35 ते 40 प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान, चालक तसेच वाहकाने बस सुरू करण्याचा आटोकाट प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही. शेवटी प्रवाशांनीच गाडीला धक्का देण्याचा बराच प्रयत्न केला तरी देखील बस सुरू झाली नसल्यामुळे अखेर प्रवाशांनी खाजगी वाहतुकीचा आधार घेत मार्गस्थ होणे पसंत केले.
एकंदरीतच प्रवासादरम्यान एसटीच्या वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे प्रवाशांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रवाशांना नाहक मनस्तापासह आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिवहन खात्याने यामध्ये गांभीर्याने लक्ष घालत प्रत्येक आगारातील एसटी बसेसची डागडुजी करून सुस्थितीत ठेवाव्यात पर्यायाने प्रवाशांचा प्रवास सुखकर करावा अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.