पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या स्नेहसंमेलनासाठी नाट्यगृह मोफत उपलब्ध होणार आहेत. या बाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आदेश काढले आहेत. संबंधित आदेशाची प्रति शहरातील चारही मोठ्या नाट्यगृहांना पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे शहरातील महापालिका शाळांना स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी येणारी अडचण टळणार आहे.
वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव भेटतो. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयांमध्ये दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित असतात. त्यामुळे या कार्यक्रमाला गर्दी होते. त्यासाठी योग्य जागेचा अभाव शाळांना जाणवतो. शाळांकडून शहरातील नाट्यगृहात स्नेहसंमेलन भरवले जात आहे. मात्र त्यासाठी खर्चाचा भुर्दंड शाळांना सहन करावा लागत आहे. त्यासाठी नाट्यगृह मोफत उपलब्ध करून दिल्यास गैरसोय टळेल, अशी मागणी करण्यात आली होती.
त्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना तसेच शिक्षण विभागाच्या कार्यक्रमाकरिता महापालिकेची सर्व नाट्यगृह मोफत उपलब्ध करुन देण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत. याबाबत नाट्यगृहांच्या व्यवस्थापकांना पत्राव्दारे त्यांनी कळविले आहे. या पत्रामध्ये नमूद आहे की, महापालिकेच्या प्राथमिक 110 व माध्यमिक 18 शाळांमध्ये स्नेहसंमेलन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच शिक्षण विभागाकडून शिक्षक दिन पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांसाठी नाट्यगृहांची गरज असल्याने नाट्यगृह मोफत उपलब्ध करुन देण्याच्या आदेशाला मान्यता देण्यात येत आहे. या आदेशाचे पत्र प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, कै. अंकुशराव लांडगे भोसरी, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव, आचार्य अत्रे रंगमंदिर पिंपरी यांच्या व्यवस्थापकांना देण्यात आले आहे.