पुसेगाव – महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव (ता. खटाव) येथील प पु श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा दि. ६ जानेवारी ते दि १६ या कालावधीत होत आहे. यात्रेचा मुख्यदिवस असलेला रथोत्सव सोहळा दि. १० जानेवारी रोजी आठ ते दहा लाख भाविकांच्या उपस्थितीत पुसेगावात होणार आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने नागपूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या रथपूजन समारंभाचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, आ. महेश शिंदे, मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, बाळासाहेब जाधव, संतोष वाघ व भरत मुळे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण स्वीकारून रथोत्सव सोहळ्याला उपास्थित राहण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री व देवस्थान ट्रस्ट चे मठाधिपती, चेअरमन व विश्वस्त यांच्यात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या विविध विकास कामांबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवस्थानचे प्रलंबित प्रश्न आणि विकास कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.