कराड – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नांदलापूर, ता. कराड येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कारवर उसाने भरलेला ट्रक शुक्रवारी सकाळी उलटून, कारचालक आणि अजय मोहन निकम, सचिन रमेश निकम, सुचित्रा सचिन निकम व संयोनी अजय निकम (रा. अपशिंगे मिलिटरी, ता. सातारा) हे जखमी झाले आहेत. नांदलापूर गावच्या हद्दीत एका खानावळीसमोर हा अपघात झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मिलिटरी अपशिंगे येथील कुटुंब कारमधून कोल्हापूरला जोतिबाच्या दर्शनासाठी निघाले होते. नांदलापूर येथे एका खानावळीजवळ चालकाने कार थांबवली. काही वेळाने उसाने भरलेला भरधाव ट्रक (एमएच-45-0833) येऊन कारवर उलटला. या अपघातात कारचालकासह पाच जण जखमी झाले. ट्रकमधील उसाच्या मोळ्या कारवर पडल्या.
या अपघातात कार आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्ग विभाग विभागाच्या कर्मचार्यांनी नागरिक आणि वाहनधारकांच्या मदतीने आणि क्रेनच्या सहाय्याने ऊस बाजूला करून, कारमधील जखमींना बाहेर काढले. त्यांनी अपघाताची माहिती शहर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर ऊस दुसर्या वाहनात भरल्यावर अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.