दुरुस्तीसाठी रेल्वे गेट बंद; पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी, प्रवाशांची गैरसोय
यशवंतनगर – कराड-मसूर रस्त्यावरील सह्याद्रि साखर कारखाना व कोपर्डे हवेली दरम्यान असलेले रेल्वे गेट नं. 96 च्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने दोन दिवस रेल्वे गेट बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे कराडहून मसूरला जाणारे आणि मसूरहून कराडला येणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
शनिवारपासून दोन दिवस कोपर्डे हवेली हद्दीतील रेल्वे गेट नं. 96 हे येथील काही तांत्रिक कामासाठी बंद ठेवण्यात आले आहे. याची पुर्व सुचना रेल्वे विभागाकडून देण्यात आली होती. परंतु, सर्वांनाच यांची कल्पना नसल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही वाहतूक धुरुंगमळा ते उत्तर कोपर्डे या रेल्वे मार्गा लगतच्या रस्त्याने सुरू आहे.
परंतु, पावसाळ्यात या रस्त्याचा वापर चिखल-मातीमुळे बंद असतो. तसेच यामध्ये मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे या कच्च्या व अरुंद मार्गाचा वापर करताना प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हा मार्ग अरुंद असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला वाट देणेही अडचणीचे ठरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
अरुंद रस्ता, रेल्वे बोगदा व एकेरी वाहतूक यामुळे वाहतूक कोंडी होऊन किरकोळ वादावादीचे प्रसंग घडत आहेत. यामुळे वाहनचालकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करत दोन दिवस याच मार्गावरून प्रवास करावा लागणार आहे.