वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – भाडळे (ता. कोरेगाव) येथे शेतामध्ये वृद्ध व्यक्तीचा अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाडळे येथील संभाजी सीताराम निकम (वय ६८) आपल्या काळवट नावाच्या शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास परिसरात विजांसह जोराचा पाऊस सुरू असताना संभाजी निकम यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटना घडताच आजूबाजूच्या लोकांनी त्यांना गावातील युवकांच्या मदतीने पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रूग्णालयात हलविले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वाठार स्टेशन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून घटनेचा पंचनामा केला. रात्री उशिरापर्यत घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस ठाण्यात सुरू होती.