संतोष पवार
सातारा – जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या 4810 अंगणवाड्यांपैकी 1793 अंगणवाड्यांना अद्याप पिण्याचे पाण्याचे स्वतंत्र नळ कनेक्शन मिळालेले नाही.
1996 अंगणवाड्या विद्युत पुरवठ्याशिवाय आहेत. संबंधित ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना देशात 2 ऑक्टोबर 1975 रोजी सुरु झाली.
जिल्ह्यात 1985 पासून योजना कार्यान्वित असून सध्या सर्व 11 तालुक्यांत 18 प्रकल्पांद्वारे 4810 अंगणवाड्यांमधून योजनेच्या सेवा लाभार्थींना दिल्या जातात. 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांच्या पोषण व आरोग्यविषयक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे हा या योजनेचा उद्देश आहे.
बालकांच्या योग्य शारीरीक, मानसिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे. अर्भक मृत्यू, बालमृत्यू, कुपोषण व शाळा गळतीच्या प्रमाणात घट करणे, योग्य पोषण आहार व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे सामान्य आरोग्य व पोषणासंबंधी काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम बनविण्याचे काम या विभागामार्फत होत आहे.
अंगणवाड्यांमध्ये पूरक पोषण आहार, आरोग्य तपासणी, लसीकरण संदर्भ सेवा, अनौपचारिक पूर्व प्राथमिक शिक्षण, आरोग्य व पोषण शिक्षण दिले जाते. या योजनेअंतर्गत 0 ते 6 महिने वयोगटातील बालके, 6 महिने ते 3 वर्ष वयोगटातील बालके, 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालके, गर्भवती व स्तनदा माता किशोरवयीन मुली, 15- 45 वयोगटातील अन्य महिलांना लाभ दिला जातो.
त्यामुळे या अंगणवाड्यांमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध असणे आवश्यक असतानाही अनेक अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सुविधाच नाहीत. 1793 अंगणवाड्यांना नळ कनेक्शन नसल्याने त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.त्यात जावळी 115, कोरेगाव 135, सातारा 233, खंडाळा 11, महाबळेश्वर 50, वाई 33, फलटण 167, खटाव 269, माण 201, म्हसवड 108, कराड 85, पाटण तालुक्यात 419 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 1978 अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र वीज जोडणी उपलब्ध असून 664 ठिकाणी भाडेतत्वावर वीज उपलब्ध करण्यात आली आहे. 172 अंगणवाड्यांमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून 1996 अंगणवाड्यांमध्ये वीज पुरवठाच उपलब्ध नाही. पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन, स्वतंत्र वीज पुरवठा नाही त्याठिकाणच्या ग्रामपंचायतींनी लक्ष घालून सोयीसुविधा पुरवण्याची गरज आहे. अशा ग्रामपंचायती, तालुका, जिल्हा प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.