कोपर्डे हवेली – कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील सरपंच नेताजी रामचंद्र चव्हाण यांच्यावर सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईविरोधात नेताजी चव्हाण यांनी पुण्याच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. त्यांच्या अर्जावर झालेल्या सुनावणीत अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे नेताजी चव्हाण पुन्हा एकदा सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोपर्डे हवेली येथील सरपंच नेताजी चव्हाण यांच्यावर सरकारी जागेमध्ये अतिक्रमण केल्याची तक्रार शरद चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागवून अपात्रतेचे आदेश दिले होते. त्यामुळे कराड तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. परंतु, या कारवाईला सरपंच नेताजी चव्हाण यांनी आव्हान देत पुणे आयुक्तांकडे अपील करुन दाद मागितली होती. त्यानुसार बुधवार दि. २९ मार्च रोजी पुणे आयुक्तांसमोर झालेल्या सुनावणीत नेताजी चव्हाण यांच्या अपात्रतेच्या कारवाईला अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांनी स्थगिती दिली आहे. त्यामुळे नेताजी चव्हाण लवकरच कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
“या कारवाईबाबत आपण पुणे विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. त्यानुसार त्यांच्याकडून योग्य न्याय मिळाला आहे. विरोधकांनी खालच्या पातळीवरील राजकारण सोडून गावच्या विकासासाठी एकत्र यावे.” – नेताजी चव्हाण (सरपंच, कोपर्डे हवेली ता. कराड)