मुंबई – अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत होता. नुकतेच त्याने सोशल मीडियाद्वारे अमेरिका दौऱ्यातील त्याचे काही खास अनुभव शेअर केले आहेत. सलग 6 दिवस अमेरिकेत ‘नियम न अटी लागू’ या नाटकाचे त्याने प्रयोग केले. यात त्याच्यासोबत अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद बर्वे सहभागी होते. या नाटकाच्या दौऱ्याचा अनुभव संकर्षण कऱ्हाडेने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
संकर्षणने अमेरिका नाटकाच्या दौऱ्यातला व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘नियम व अटी लागू नाटकाचा आज अमेरिकेतला 13 प्रयोगांचा दौरा संपूर्ण झाला.. आजच्या tampa च्या प्रयोगाला सुद्धा जोरदार प्रतिसाद मिळाला. एकुण 36 दिवस, 21 विमान प्रवास, हजारो मैलांचे अंतर, 13 शहरं , नाटकाच्या सगळ्या प्रयोगांना मिळुन आलेले, भेटलेले, जवळपास 5000 मराठी रसिक प्रेक्षक आणि मिळालेलं अगणित प्रेम…’
‘अमेरिकेच्या ह्या दौऱ्यात खूप प्रेम मिळालं. नाटक सगळ्या प्रेक्षकांना खूप आवडलं. प्रयोगाच्या निमित्ताने 13 वेगवेगळ्या शहरांतल्या मराठी कुटुंबांच्या घरी राहाता आलं.. त्यांनी खूप प्रेम दिलं…. काही ठिकाणी माझ्या घरच्या सारखा गणेसोत्सव होता, तर काही घरांतल्या हातची चव अगदी माझ्या आईच्या हातची.. काही ठिकाणी औक्षण करुन स्वागत झालं तर , काही ठिकाणी निरोप द्यायला सगळं कुटुंब दारात उभं बघून मलाही रडू आलं..’
View this post on Instagram
पुढे त्याने लिहिले की, ‘कामासाठी, नोकरीसाठी , कुटुंबासाठी आपल्या “भारतापासून” सातासमुद्रापार असलेली हि सगळी मराठी माणसं , कुटुंब त्यांच्यातली रसिकता पूरेपूर टिकवून आहेत …. हे सगळं समृद्ध करणारं आहे. ह्या सगळ्यासाठी THANK YOU अमेरिका आणि आता उद्या सुरू होणार परतीचा प्रवास आपल्या भारताकडे… फार फार आठवण येतीये. आता कान आतूर झालेत ऐकायला कि , “कुछ ही समय बाद हमारा विमान मुंबई के छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रिय हवाई अड्डे पर उतरेगा, 11 ऑक्टोबरला पहाटे पोहचतो आणि मग भेटूच.’
संकर्षणने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने एका हातात भारताचा आणि दुसऱ्या हातात अमेरिकेचा राष्ट्रध्वज पकडल्याचे दिसत आहे. दरम्यान, ‘नियम न अटी लागू’ या नाटका व्यतिरिक्त संकर्षण ‘तीन अडकून सीताराम’ या सिनेमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.