भाटघर, (वार्ताहर) – पसुरे (ता.भोर) गोळीबार प्रकरणातील आरोपी कर्नल हितेश सिंग हा येरवडा कारागृहात आहे. त्याने सुटका मिळवण्यासाठी पुणे येथील अॅडिशनल सेशन कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने हा जामीन अर्ज फेटाळला असल्याने कर्नल हितेश सिंग याचा येरवड्यातील मुक्काम वाढला आहे.
गेल्या बारा दिवसांपूर्वी भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील परिसरात पसुरे येथे झालेल्या जमिनीच्या वादातून एका फार्महाऊसचा मालक कर्नल हितेश सिंग याने शेतकऱ्यांना भीती दाखवण्यासाठी हवेत दोन वेळा गोळीबार केला होता. याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली होती. यावेळी भोर पोलिसांनी भोरच्या कोर्टात आरोपीला हजर केले असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी दिली होती.
सिंग याचे पसुरे येथे फार्महाउस आहे. त्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीमध्ये विजेचे पोल उभे केल्याने त्याला जाब विचारण्यासाठी अशोक गेनबा बिऱ्हामणे, प्रकाश तुकाराम शेलार, शंकर दिनकर बिऱ्हामणे, सोनबा कोंडीबा बिऱ्हामणे, चंद्रकांत कुरंगवडे आदी शेतकरी गेले असता त्यांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला होता. यादरम्यान सिंग याने शेतकऱ्यांना धमकावण्यासाठी हवेत दोन गोळ्या झाडल्या होत्या. पोलिसांनी त्याला अटक केली असून सिंग येरवडा कारागृहात आहे.