- राज्यमंत्री बच्चू कडू : विक्रीकर निरीक्षक सुनील शेलार यांनी रेखाटले चित्र
तळेगाव स्टेशन – जगद्गुरू संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर साधना करीत असताना त्यांच्याजवळ वाघ, सिंह आले, अंगावर नाग हिंडू-फिरू लागले, पण तुकाराम महाराजांचे चित्त शुद्ध असल्यामुळे हे सर्व शत्रुही त्यांचे मित्र झाले, हा प्रसंग सुनील शेलार यांनी चित्राच्या माध्यमातून हुबेहूब साकारला आहे, साधना चित्रातून शेलार यांनी तुकोबांच्या सुप्त बाजू जगासमोर मांडली आहे, असे मत राज्यमंत्र बच्चू कडू यांनी यांनी व्यक्त केले.
नाशिक येथील विक्रीकर निरीक्षक सुनील शेलार यांनी लॉकडाऊनच्या काळात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावरील एका प्रसंगाचे हुबेहूब चित्र रेखाटले. या चित्राचे अनावरण भंडारा डोंगर येथे राज्यमंत्री बच्चू कडू, हभप अजय महाराज बारस्कर, संतोष पवार, विनोद सिंग परदेशी, श्रीक्षेत्र भंडारा डोंगराचे विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, दत्तोबा कराळे पाटील, किसन कराळे पाटील, तानाजी कराळे पाटील, शांताराम कराळे पाटील, युवा मोटिवेशनल स्पीकर शुभम मेदनकर, पिंपरी-चिंचवड प्रहारचे शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे व संघटक नीरज कडू यांच्या उपस्थित झाला.
“साधना’ या चित्राच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबारायांचे वेगळी माहिती जगासमोर येत आहे. मी पंढरीचा प्रत्यक्ष पायी चालणारा वारकरी जरी नसलो तरी जगद्गुरू तुकारामांच्या विचाराने काम करणारा, रंजल्या गांजलेल्यांची सेवा करणारा आणि “भले तरी देऊ’ या अभंगाप्रमाणे वागणारा मी अनुयायी आहे. त्यामुळे या चित्राचे प्रकाशन अनावरण माझ्या हातून झाले, हा वेगळाच आनंद माझ्या जीवनामध्ये आला आहे, असे बच्चू कडू यांनी नमूद केले.
या वेळी अजय महाराज बारस्कर म्हणाले की, भंडारा डोंगरावर जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कपाट म्हणजेच सम्राट अशोककालीन लेण्यांमध्ये कठोर साधना केली, एकांतामध्ये अभंगलेखन केले. येथे एक स्तुप आहे. तुकाराम महाराजांच्या काळापासून वारकरी परंपरेमधील अनेक संत महाराज कीर्तनकारांनी या लेण्यांमध्ये साधना केली आहे. अभ्यास केला आहे. या लेण्यांना वारकरी धर्मामध्ये “कपाट’ असे म्हणतात.
या वेळी सुनील शेलार म्हणाले की, मी सहज एक शिवाजी महाराजांचे चित्र काढले ते व्हॉट्सअपवर टाकले अनेकांनी माझे कौतुक केले. बारस्कर महाराजांनी हे चित्र पाहिले आणि मला हा प्रसंग सांगितला. या लेण्यांची चित्रे फोटो मला पाठवले आणि मला हे चित्र काढायचे सांगितले खरंतर मी कुठलेही चित्रकलेचे शिक्षण घेतले नाही; परंतु सहज सरावांनी मला हे जमत गेले. याकामी अनेकांनी मला मदत केली.
दरम्यान, मूळ अहमदनगर येथील असलेले सुनील शेलार यांनी कुठेही चित्रकलेचे शिक्षण घेतलेले नाही. शालेय शिक्षणानंतर कम्प्युटर इंजिनिअर त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर अशा शासकीय सेवेत काम करणाऱ्या या अधिकाऱ्याने आपल्या अंगातील सुप्त कला या अप्रतिम चित्रामधून प्रदर्शित केली आहे.
या कार्यक्रमाचे स्वागत पिंपरी-चिंचवड प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष नंदकिशोर जगदाळे यांनी केले. पुणे जिल्हा संघटक नीरज कडू यांनी आभार मानले.