नवी दिल्ली – युवा कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने ऑलिम्पिकपटू कुस्तीगीर सुशील कुमारसह एकूण 17 जणांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत.
या सर्वांवर खून, खुनाचा प्रयत्न, दंगल तसेच गुन्हेगारी कट रचणे आदी विविध कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर न्यायालयाने दोन फरार आरोपींवरही आरोप निश्चित केले आहेत.
गेल्या वर्षी 4 मे रोजी सागर या कुस्तीपटूला छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर मारहाण करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओ व्हायरलही झाला होता. यानंतर दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटू सुशील कुमार व त्याच्या साथीदारांना अटक केली होती. दिल्ली न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी सुशीलसह 20 जणांना आरोपी बनवले असून दोन आरोपी फरार आहेत. या प्रकरणी जवळपास 170 पानांचे आरोपपत्र तयार करण्यात आले आहे.