मुझफ्फरनगर (यूपी) – उत्तर प्रदेशातील भाजप आमदार विक्रम सैनी आणि अन्य 11 जणांना 2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी मंगळवारी विशेष न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश गोपाल उपाध्याय यांनी त्यांना दंगल आणि इतर गुन्ह्यांसाठी दोषी ठरवले आणि प्रत्येकी 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला.
या खटल्यातील अन्य 15 आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. उत्तर प्रदेशातील खतौली येथील भाजपचे आमदार असलेले सैनी यांनी या निकालाविरोधात अपील करणार असल्याचे सांगितले. या निकालानंतर आमदार आणि इतरांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांची उच्च न्यायालयात जाण्यासाठी प्रत्येकी 25,000 रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
विक्रम सैनी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. सप्टेंबर 2013 मध्ये मुझफ्फरनगर आणि आजूबाजूच्या भागात जातीय संघर्ष सुरू झाला, त्यात 60 लोक मारले गेले आणि 40,000 लोक विस्थापित झाले होते.