नवी दिल्ली – सदनिका रिकामी न करण्याच्या वादातून 4 मे 2021 रोजी पैलवान सोनू महल, रविंद्र विकास यांच्यासह सागर धनखड नावाच्या नवोदित पैलवानाला स्टेडियममध्येच बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत सागरचा मृत्यू झाला. बाह्य दिल्ली परिसरातील छत्रसाल स्टेडियममध्ये बोलवून सागर धनकडचा निघृण मारहाण करून खून करण्यात आला होता.
मारहाण करणारे सगळेजण कुस्तीत ऑलिंपिक पदक विजेता सुशीलकुमारचे मित्र होते. असे सांगितले जाते की, या मित्रासमवेत सुशीलुकमार स्टेडिमयमध्ये आला होता. ज्या कारमधून हे सगळेजण आले होते त्यात बेसबॉलच्या बॅटसह अनेक हत्यारे होती. एवढेच नव्हे तर स्टेडिमयमध्ये आल्यानंतर या सगळ्या आरोपींनी स्टेडियमचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले होते. जेणेकरून सागर धनकड पळून जाऊ नये. या सगळ्या प्रकरणाचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. ज्यामध्ये आरोपी सागरला मारहाण करताना दिसत आहे.
आता या प्रकरणी दिल्ली न्यायालयात खुनाचा प्रयत्न, दंगल घडवणे, बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचणे इत्यादी आरोप सुशीलकुमार आणि अन्य 17 जणांवर दाखल करण्यात आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. सुशीलकुमारनेच पैलवान सागर धनकडचा खून करण्याचा कट रचला होता असे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी होऊन आरोप सिद्ध झाल्यास सुशीलकुमारला शिक्षा होऊ शकते.
सागरवर नाराज होता सुशीलकुमार
सुशीलकुमारने त्याची पत्नी सावी हिच्या नावावर दिल्लीतील मॉडेल टाऊन भागात 90 लाख रुपये देऊन एक वादग्रस्त सदनिका खरेदी केली होती. ती सदनिका त्याने सागर धनकड आणि सोनू महाला महिन्याला 40 हजार रुपये भाड्याने दिली होती. सागर आणि सोनू दोघांची त्या भागातील दबंग अशी प्रतिमा होती आणि ते लक्षात घेऊनच सुशीलने त्यांना सदनिका भाड्याने दिली होती. दोघेही छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीचा सराव करत असत. सागर आणि सोनूने काही महिने भाडे दिले आणि नंतर भाडे थकविले आणि सदनिकेत हिस्सा मागू लागले.
पोलिसांकडे न जाण्याची चूक महागात
या प्रकरणात जर सुशीलकुमारने दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली असती तर सदनिका रिकामी होण्याबरोबरच खुनाच्या प्रकरणात अडकण्याचा प्रसंग आला नसता. असे सांगितले जाते की, सुशीलकुमार आधीपासूनच काही गुंडांच्या संपर्कात होता. त्यामुळे त्याचा पोलिसांपेक्षा अशा प्रवृत्तीच्या लोकांवर जास्त विश्वास होता.
सुशीलकुमारला जीवे मारण्याची धमकी
दुसरीकडे सुशीलकुमारने अजय सहरावतच्या मदतीने दोघांकडे भाड्याची मागणी सुरू केली तेव्हा त्या त्यांनी सुशीलकुमारला जीवे मारण्याची धमकी दिली होती. इथूनच सुशीलची सागर धनकड आणि सोनू महालशी दुष्मनी सुरू झाली. त्याची परिणिती सागर धनकडच्या खुनात झाली. या प्रकरणात सीसीटीव्ही तपासून व अन्य तपासातून सुशीलकुमारचे नाव पुढे आले. त्याला अटक झाल्यानंतर 5 ऑक्टोबर 2021 रोजी त्याच्या जामनी अर्जावरील सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी आनंद यांनी त्याचा जामीन फेटाळताना म्हटले की, जेव्हा एखादी प्रसिद्ध व नामवंत व्यक्ती गुन्हा करते तेव्हा त्याचा समाजावर व्यापरक परिणाम होत असतो.