सोलापूर – वारकरी संप्रदायातील सत्पुरुष भोजलिंग महाराज यांच्या चौथ्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त 2 ऑगस्ट रोजी घेरडी (ता. सांगोला, जि सोलापूर) येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भोजलिंग महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. निरपेक्ष सेवा भावनेने वारकरी संप्रदायाचा प्रचार-प्रसार केला. त्यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना, समाधी स्मारकाचे कलशारोहण आणि त्यांच्या स्मृती विशेषांकाचा प्रकाशन सोहळा 2 ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त वारकरी संप्रदायात प्रमाण असलेल्या नऊ थोर वारकरी संतांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.
संत नामदेव महाराजांचे वंशज हभप माधव महाराज नामदास, संत सावता महाराजांचे वंशज हभप रविकांत महाराज वसेकर, संत नरहरी महाराजांचे वंशज हभप प्रमोद महाराज महामुनी, संत चोखामेळा महाराजांचे वंशज हभप अभिमन्यू महाराज सर्वगोड, संत भानुदास आणि संत एकनाथ महाराजांचे वंशज हभप योगीराज महाराज गोसावी, संत शेख महंमद महाराजांचे वंशज हभप मोसिम महाराज शेख, संत तुकाराम महाराजांचे वंशजहभप बापूसाहेब महाराज देहूकर, संत संताजी महाराजांचे वंशज हभप जनार्दन महाराज जगनाडे तसेच फडकरी प्रतिनिधी म्हणून हभप ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर या सर्वांच्या शुभहस्ते सद्गुरु संत भोजलिंग महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन घेरडीकर फडाचे प्रमुख आणि सद्गुरु भोजलिंग महाराजांचे वंशज हभप स्वप्निल महाराज बंडगर तसेच हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी केले आहे.
सकाळी ७ ते ८:४५ वाजेपर्यंत भोजलिंग महाराज मूर्तीची नगरप्रदक्षिणा, सकाळी ९:४५ ते १०:१५ सद्गुरु भोजलिंग महाराज मूर्ती प्रतिष्ठापना, सकाळी १०:१५ ते १०:३० कलशारोहण सोहळा ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांचे हस्ते होईल. सकाळी १०:४५ ते १२:४५ पुष्पवृष्टीनिमित्त ह.भ.प. स्वप्निल महाराज बंडगर यांचे कीर्तन होईल. त्यानंतर ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर संपादित भोजलिंग महाराज स्मृती विशेषांकाचे प्रकाशन आणि दुपारी १:२० ते २:२० सकल संत वंशज आशीर्वचनपर मनोगत व्यक्त करतील. दुपारी २:३० वाजलेपासून पुढे दर्शन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम घेरडीतल्या सद्गुरू भोजलिंग महाराजांच्या समाधी स्मारक परिसरात पार पडणार आहे.