दोघांना पोलिसांनी दिली समज ः प्रशासनानेही घेतली तातडीने बैठक
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
संगमनेर (प्रतिनिधी) – संगमनेर शहरात बसस्थानकावर करोनाचा रुग्ण आढळल्याची बातमी शुक्रवारी सकाळी सोशल मीडिया पसरली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने त्याची खातरजमा केली असता, ती अफवा असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाने तातडीने बैठक घेतली.
शुक्रवारी (दि.13) सकाळी शहरातील एका व्हॉट्स ऍप ग्रुपवर दोन व्यक्तींनी आत्ताच संगमनेर बसस्थानकावर करोनाचा रुग्ण आढळला असून, त्याला संगमनेर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आपण गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये व तोंडाला रुमाल अथवा मास्क लावावे, असा मेसेज व्हायरल केला. त्यामुळे सोशल मिडीयावर काही नेटकऱ्यांनी त्यावर विश्वास ठेवला होता. मात्र या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर पुरुषोत्तम पोखरकर आणि घुलेवाडी ग्रामीण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. कचोरिया यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारी अर्ज दिला. दरम्यान पोलिसांनी संबंधितांना पोलीस ठाण्यात बोलून घेऊन समन्स दिला असल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सांगितले.
याबाबत प्रशासन सतर्क झाले असून, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यांनी दुपारी शहरातील सर्व डॉक्टर आणि औषध विक्रेत्यांची बैठक घेतली. याबबत त्यांना योग्य त्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू, नये असे आवाहन केले आहे. संगमनेरमध्ये अद्याप एकही करोना संशयित किंवा लागण झालेला रुग्ण आढळलेला नसून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सावधगिरी बाळगली पाहिजे.
गर्दीची ठिकाणे टाळा, सर्दी खोकला झाल्यास ताबडतोब योग्य ते औषधोपचार करा, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा किंवा रुमालाचा वापर करा, असे आवाहन प्रांताधिकारी मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, ग्रामीण रुग्णालय अधिकारी डॉ. भवर, मुख्यधिकारी डॉ. संजय बांगर यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे ही यावेळी सांगण्यात आले.