मंचर, (प्रतिनिधी)- मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे जमिनीच्या वादातून तरुणांच्या दोन गटांत हाणामारी झाली. दोन्ही गटातील सहा जणांवर पारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अमोल रामदास मेंगडे व आकाश दशरथ मेंगडे यांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार अमोल रामदास मेंगडे, प्रणय माऊली मेंगडे, तुषार रामदास मेंगडे, उत्तम दशरथ मेंगडे, बबलू उर्फ तेजस बाळासाहेब मेंगडे, ओंकार दशरथ मेंगडे (सर्व रा. मेंगडेवाडी) या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या फिर्यादीत म्हटल आहे की, अमोल मेंगडे 20 मे रोजी दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान मेंगडेवाडी गावच्या हद्दीत ई सेवा केंद्राच्या समोर उभा असताना त्याला चुलत भाऊ उत्तम मेंगडे याने शिवीगाळ केली.
त्यानंतर तेजस मेंगडे, ओमकार मेंगडे यांनी लाकडी काठी घेऊन फिर्यादी अमोल मेंगडे याला मारहाण केली. तसेच ओमकार मेंगडे व बबलू मेंगडे यांनी बिअरची बाटली अर्धवट फोडून फिर्यादीच्या डोक्यात खांद्यावर मारून दुखापत केली आहे. यावेळी तेजस मेंगडे हा भांडणे सोडवित असताना त्यालाही बबलूने बिअरची फोडलेली बाटली पंजावर मारून दुखापत केली.
तर ओमकार दशरथ मेंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जमिनीच्या वादाच्या कारणावरून अमोल मेंगडे याने फिर्यादीचा मित्र उत्तम मेंगडे याची गचुंडी पकडून शिवीगाळ केली तसेच बबलू मेंगडे, उत्तम मेंगडे यांना तुम्हाला लय माज आलाय का, तुमचा माज उतरवतो असे म्हणत लाथा बुक्क्यांनी, व लाकडी काठीने मारहाण करत दुखापत केली आहे.