नगर – महापालिकेसारख्या शासनाच्याच संस्थेच्या क्रीडांगणावर महसूल विभागाने – ताबेमारी केल्याचे सांगितले जात आहे. सावेडीच्या महापालिकेच्या क्रीडांगणाच्या जागेत विविध कारणाने जप्त केलेली वाहने लावल्याने खेळाडूंनी खेळावे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या सावेडीतील गंगा उद्यान मागील क्रीडांगणावर महसूल विभागाने जप्त केलेल्या गाड्या लावल्यामुळे खेळाडूंना खेळण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत.
सावेडीच्या जॉगिंग ट्रॅक मैदानावर जागा अपुरी पडू लागल्याने गंगा उद्यानामागील मैदानात खेळांची प्रॅक्टिस चालू असते. मात्र जुन्या आणि भंगार गाड्या लावल्यामुळे पालक मुलांना या ठिकाणी पाठवण्यास तयार नाहीत. त्यामुळे या गाड्या लवकरात लवकर काढाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. तहसील कार्यालयामागील जागेवर महसूल भवन बांधण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. या जागेवर काही वर्षांपासून महसूल विभागाने कारवाई केलेल्या वाळू डंपर, जेसीबी, ट्रॅक्टर, ट्रक अशा अनेक गाड्या ठेवण्यात आल्या होत्या.
महसूल भवनाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामुळे या सर्व गाड्या गंगा उद्यानामागील मोकळ्या मैदानावर लावण्यात आल्या. या गाड्या दोन दिवसात काढून घेतल्या जातील असे अपेक्षित असतानाच या ठिकाणी आता पोलिसांसाठी शेड टाकून तेथे लाईट मीटर घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल विभाग या ठिकाणावरून आपला डेरा हलवणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महसूल विभागाने मनपाच्या क्रीडांगणावर ताबा मारला काय अशी चर्चा सुरू आहे.