Eknath Shinde – मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलो, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण (maratha Reservation) देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही त्यांनी केले. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असे सांगत त्यांनी राज्यातील प्रत्येक समाज घटकाला न्याय देणार असल्याची ग्वाही दिली.
मुंबईतील आझाद मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांची हिंमत घेऊन मी धाडसाने मुख्यमंत्री झालो आहे. परंतु त्यांना वाटते की, त्यांची मक्तेदारी आहे. पण त्यांची मालकी कोणामुळे?
असा प्रश्न उपस्थित करत लाखो शिवसैनिकांमुळे तुमची मक्तेदारी होती. तुमची मालकी नाही, असा जोरदार टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला.
जसे मोगलांच्या काळात घोड्यांनाही पाणी पिताना संताजी-धनाजी दिसायचे, तसेच तुम्हाला प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतो का? मी सामान्य माणसांचा शिवसैनिक आहे. तुम्ही गहाण टाकलेली शिवसेना मी सोडवली, हे पाप आहे का? असे प्रश्न त्यांनी विचारले.
मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचे सरकार आणले. यापूर्वी तुम्ही सरकार पडणार असे म्हणत होता. परंतु आम्हाला विकासासाठी अजित पवारांची साथ मिळाली. आम्हाला आता 210 आमदार आहेत.
असे असताना आता तुम्ही मुख्यमंत्री बदलणार, असे दररोज सांगता. मी कधीच पदासाठी काम करत नाही. तुम्ही कितीही काही केले तरी हा एकनाथ शिंदे आता मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.