लोणी देवकर -येथील ग्रामदैवत वेताळ यात्रेनिमित्त मंगळवारी (दि. 22) ग्रामस्थांनी जंगी कुस्त्यांचे आयोजन केले होते. वेताळबाबा कुस्ती आखाड्याला दुपारी तीन वाजता सुरुवात होऊन रात्री नऊपर्यंत जवळपास 220 मल्लांनी सहभाग घेतला होता. शिवाय महिलांच्याही कुस्त्या होत्या. मल्लांना साडेसहा लाख रुपये इनाम ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला. सर्व कुस्ती शौकिनाचे लक्ष वेधून घेतले ते श्रीगोंद्या तालुक्यातील महिला मल्ल धनश्री फंड आणि अहिल्या शिंदे आणि श्रीगोंद्याचीच आंतरराष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फंड विरुद्ध कामिनी दिवेकर.
या दोन्ही कुस्त्या फंड भगिनींनी जिंकून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच सरपंच कन्या पैलवान वैष्णवी विरुद्ध मुग्धा देशमुख यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये वैष्णवी तोरावे हिने बाजी मारली. शेवटची कुस्तीविष्णू खोसे आणि भारत मदने यांच्यात झाली. यामधे भारत मदने या मल्लाने क्षणार्धात कुस्ती जिंकत प्रेक्षकांची मने जिंकली. यामध्ये मल्लांच्या विविध प्रकारच्या डावपेचाचे प्रदर्शन केले. ही कुस्ती प्रसिद्ध महाराष्ट्र केसरी मल्ल रावसाहेब मगर यांच्या हस्ते लावण्यात आली होती.
कुस्ती आखाड्याचे समालोचन सांगलीचे शंकर पुजारी, इंदापूरचे सुभाष दिवसे व गार अकोल्याचे युवराज केचे यांनी केले. कुस्त्या पाहण्यासाठी परिसरातील हजारो कुस्ती शौकिनांनी तुफान गर्दी केली होती. कुस्त्यांचे आयोजन माजी सरपंच अमोल तोरवे, विजय डोंगरे, सचिन डोंगरे, अनिल तोंडे – पाटील, सागर तोंडे – पाटील, अर्पण डोंगरे आणि महेश डोंगरे यांनी केले होते.