बीजिंग- चीनमधील राजकारणावर निर्भयपणे आपली मते व्यक्त करणे एका उद्योजकाला महागात पडले आहे. रेन झिकियांग हे त्यांचे नाव असून त्यांना 18 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
करोनाचे संकट हाताळण्यात अपयश आल्याबद्दल त्यांनी काही महिन्यांपूर्वी चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्यावर टीका केली होती. त्यांनी यासंदर्भात एक लेखही लिहिला होता. हुआयुआन प्रॉपर्टीचे माजी अध्यक्ष असलेल्या झिकियांग यांनी आपल्या चार चुका मान्य केल्या आहेत. त्याकरता त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच जिनपिंग यांच्याबाबतच्या टीकेवरून त्यांना 4.2 दशलक्ष चीनी युआन दंडही ठोठावण्यात आला आहे.
झिकियांग यांच्या भ्रष्टाचार आणि पदाचा दुरूपयोग केल्याचाही आरोप होता. 2014 ते 2017 या काळात 132 दशलक्ष युआन लाच घेतल्याच्या आरोपातही त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, झिकियांग यांनी जिनपिंग यांच्यावर टीका केल्यामुळेच त्यांना एवढी मोठी शिक्षा ठोठावण्यात आल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. त्यांना कठोर शिक्षा देउन आपल्या विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न यातून जिनपिंग यांच्या प्रशासनाने केला आहे. एका व्यक्तीला मारून अन्य शेकडो लोकांवर दहशत बसविण्याचाच हा प्रकार असल्याचे एका व्यक्तीने म्हटले आहे.
रेन झिकियांग यांनी मार्च 2020 मध्ये एक लेख लिहिला होता. त्यात कोणाचे नाव नव्हते, मात्र त्यांच्या टीकेचा रोख जिनपिंग यांच्यावरच होता, असे मानले गेले. तेव्हापासून झिकियांग गायबच होते.