पुणे -“खासदार गिरीश बापट हे आमचे जुने मित्र असून, आमची जीवलग मैत्री आहे. त्यांची आज भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आजच्या भेटीने जुन्या आठवणींना उजाळाला मिळाल. ते लवकरच बरे होतील आणि पुन्हा जनसेवेचे काम सुरू करतील,’ असा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्र्यांनी खासदार बापट यांची पुण्यात भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. सध्या कसबा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, ही जागा जिंकण्यासाठी भाजपसह महायुतीने तयारी केली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात बापट यांच्या भेटीचे कोणतेही नियोजन नसताना अचानक आळंदीहून थेट घोले रोडला मुख्यमंत्री दाखल झाले. त्यामुळे नक्की भेट कशासाठी अशी चर्चा रंगू लागल्या आहेत.
बापट यांच्या भेटीत काय चर्चा झाली, असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता, “मी सदिच्छा भेटीसाठी आलो होतो. मी बोलण्याअधीच बापट यांनी कसबा विधानसभेची चिंता तुम्ही करू नका’, मी इथे बसलोय, सगळे नेटवर्क चांगले आहे,’ असे सांगितले. बापट यांचा प्रवास आणि मैत्री जी जवळून अनुभवली आहे, जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. त्यामुळे जनता दोन्ही जागांवर आम्हाला निवडून देईल आणि दिवंगत आमदारांच्या मतदारसंघातील राहिलेली अपूर्ण कामे मार्गी लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.