जेरुसलेम, (इस्रायल) – हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांचे नातेवाईक आज संसदेतल्या दालनामध्ये सुरू असलेल्या वित्त कमिटीच्या बैठकीमध्ये घुसले आणि त्यांनी अपहरण झालेल्या आपल्या नातेवाईकांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली. आपले नातेवाईक तेथे मरण यातना सोसत असताना तुम्ही इथे बसू शकत नाहीत, अशा शब्दांमध्ये त्यांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले.
रविवारी या नागरिकांनी राजधानी जेरुसलेममध्ये एक तात्पुरता तंबू ठोकला आणि तेथेच धरणे आंदोलन देखील सुरू केले होते. सरकारने आपल्या नातेवाईकांच्या सुटकेसाठी ठोस पावले उचलेपर्यंत तेथेच मुक्काम करण्याचा इशारा या नागरिकांनी दिला होता.
हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबरच्या हल्ल्याच्यावेळी दिडशेपेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचे अपहरण केले होते. त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणी या नागरिकांच्या नातेवाईकांकडून इस्रायल सरकारकडे सातत्याने केली जाते आहे. त्यासाठी या नागरिकांनी इस्रायलच्या राजधानीमध्ये वारंवार निदर्शने देखील केली आहेत. हमासने काही अपहृत नागरिकांची सुटका केली असली, तरी अजूनही अनेक नागरिक हमासच्या ताब्यातच आहेत.